। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुडच्या समुद्रात किनारपट्टीवर टायनी लाल कोलंबी आणि सोलट (मोठी) कोलंबी मिळू लागल्याने मुरूड, एकदरा, राजपुरी, दिघी आदी गावच्या मासेमारी नौका सुमारे 10 वाव समुद्रात मासेमारीस शुक्रवारी सकाळी रवाना झाल्या आहेत. नौकांची संख्या सुमारे 80 आहे अशी माहिती मुरूडचे अनुभवी ज्येष्ठ मच्छिमार कृष्णा बैले यांनी दिली. सध्या मासळी मिळण्याचे प्रमाण कमी असले तरी हस्त नक्षत्रानंतर पूर्व दिशाकडून येणारे जोरदार साट नावाचे वारे वाहू लागल्यास समुद्रातून मोठया प्रमाणात मासळी मिळेल. 27 किंवा 28, 29 सप्टेंबर या दिवसात साट वादळी वादळी वार्यांची स्थिती येऊ शकते, अशी माहिती कृष्णा बैले यांनी दिली. यामुळे पापलेट, कुपा, घोळ, मांदेली, मोठी कोलंबी, रावस मासळी मोठ्या प्रमाणात मिळेल असा माझा अनुभव आहे, असे बैले म्हणाले. मुरुडच्या समुद्रकिनारी टायनी लाल कोलंबी मिळू लागली असली तरी नेहमीपेक्षा प्रमाण कमी आहे. परंतु साट वारे वाहू लागताच समुद्राच्या पाण्याचा रंग दुधाळ होतो. मासळीला आवश्यक खाद्य देखील किनार्याकडे येत असल्याने मासळी निसर्ग नियमानुसार याकडे आकर्षित होत असते. साट वार्यांचा प्रभाव समुद्रात तास दीड तासच असतो परंतु समुद्रात मच्छिमारांचा मोठा कस लागतो. मासळीसाठी अनुकूल स्थिती घेऊन येणारे साट वारे येणार असतील तर समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना 2 तास आधी डोंगरावरील मातीचा वास येऊ लागतो. त्यानुसार मच्छिमार सुरक्षा विषयक काळजी घेतात अशी माहिती कृष्णा बैले यांनी दिली.