जिते गावाला जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट
| खरोशी | वार्ताहर |
पेण तालुक्यातील जिते आणि रावे या दोन गावांमध्ये डेंग्यूची साथ पसरल्यामुळे बारा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. याबाबत कृषीवलने आवाज उठवल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, आरोग्य अधिकाऱ्यांनी जिते गावाला भेट देऊन उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
दरम्यान, डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात होऊ नये व योग्य वेळी त्यांच्यावर उपचार व्हावेत याकरिता शनिवारी (दि.15) रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथील डीएचओ डॉ. मनीषा विखे, एडीएचएस मलेरिया डॉ. सोनवणे, डीएमओ डॉ. भोसले, तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर यांच्या पथकाने ग्रामपंचायत कार्यालय आणि जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेट देऊन डेंग्यूची साथ नियंत्रण आणण्याबाबत सक्त ताकीद देऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत आणि पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जनजागृती करणे, गावात स्वच्छता ठेवणे, रुग्ण आहेत तोपर्यंत गावात सर्वे चालू ठेवणे, सीएचओमार्फत तपासणी करणे, बुधवार हा दिवस कोरडा पाळणे, औषधसाठा भरपूर ठेवणे, प्राथमिक उपचार जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातच देणे, अशा विविध सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात गावातील सर्व रुग्णांवर योग्य उपचार चालू असून, ते लवकरात लवकर बरे होतील, असेही सांगितले.