। अलिबाग । वार्ताहर।
रायगड जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची मानधनावर नियुक्ती केली होती. त्यानंतर शिक्षकांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. पण जिल्हा परिषदेला मानधन देण्याची जबाबदारी पार पाडता आली नाही. त्यामुळे आमचे मानधन केव्हा मिळेल, असा सवाल हे निवृत्त शिक्षक करत आहेत.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात मानधनावर किती शिक्षक आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. तरीही ही संख्या शंभरहून अधिक असल्याचो बोलले जाते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. शिक्षकांची भरती होत नसल्यामुळे दर महिना 20 हजार रुपये मानधनावर सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला. तशी जाहिरात प्रसिद्ध करून डिसेंबर 2023 पासून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. प्रथम शिक्षण विभागाने या शिक्षकांचे नियुक्ती पत्र गट विकास अधिकार्यांच्या सहीने गट शिक्षण अधिकारी (प्राथमिक शिक्षण विभाग) यांच्या कार्यालयामार्फत पाठवण्यात आले. डिसेंबर 2023, त्यानंतर जानेवारी 2024 चे मानधन न मिळाल्याने शिक्षकांची चलबिचल झाली. याबाबत मानधनावर काम करणारे निवृत्त मुख्याध्यापक अजय पाटील यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक), शिक्षण विभाग, रायगड जिल्हा परिषदेचे सीईओ, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी (प्राथमिक शिक्षण विभाग) यांना प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदन दिले. त्यानंतरही काही झाले नाही. मग त्यांनी या सर्व तक्रारींची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, अलिबाग कक्षात दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांना जाग आली. फेब्रुवारीपर्यंतचे मानधन एप्रिल अखेरीस अनेक पाठपुराव्यानंतर जमा झाले. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे या शिक्षकांचे मानधन रखडले आहे. तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी केली आहे.







