। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान पर्यटनस्थळी वन विभागाच्या पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छता गृह उभे केले आहेत. रेडिमेड स्वच्छता गृह माथेरान शहरात विविध भागात उभे करण्यासाठी वन विभागाने खरेदी केले होते. मात्र वन विभागाच्या नियोजनाचा अभाव यामुळे अनेक स्वच्छता गृह वापराविना खराब होऊन गेली आहेत. मात्र त्यातील शार्लोट लेक तसेच एको पॉईंट भागात उभे करण्यात आलेले स्वच्छतागृह यांचीदेखील दुरवस्था झाली आहे.
माथेरान शहरात पर्यटक थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटनासाठी येत असतात. त्या पर्यटकांसाठी वन विभागाच्या माध्यमातून स्वच्छतागृह उभारण्यात येणार होती. त्यासाठी जो पार्किंग कर गोळा होतो. त्या निधीमधून वन विभागाने स्वच्छतागृहांची खरेदी केली. फायबर स्वरूपात असलेली स्वच्छतागृह शहरातील प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी बसविण्यात येणार होती. गेली अनेक महिने स्वच्छतागृह वाहनतळ येथे पडून होती. त्यातील नवीन स्वच्छता गृह अनेक महिने एकाच ठिकाणी पडून राहिल्याने खर्रब देखील झाली होती.त्यातील दोन स्वच्छतागृह शार्लोट लेक आणि एको पॉईंट येथे बसविण्यात आले होते. त्या स्वच्छतागृहांचा पर्यटकांकडून वापर होत होता. मात्र या पर्यटन हंगामात त्यापैकी एकही स्वच्छतागृहांचा वापर होऊ शकला नाही.
शार्लोट लेक आणि एको पॉईंट येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून वन विभागाकडे त्या त्या ठिकाणच्या व्यवसायिकांनी तक्रारी करून माहिती देऊनदेखील वन विभाग त्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यासाठी तेथे पोहचला नाही. त्यात पर्यटन हंगामात माथेरान मध्ये येणार्या महिला पर्यटकांची शार्लोट लेक तसेच एको पॉईंट या गजबजलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह सुस्थितीत नसल्याने त्यांची गैरसोय होती. माथेरान शहरात पर्यटकांना सोयीसुविधा मिळत नाहीत. याबद्दल माथेरान वन व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गिरीश पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त केली आहे.
माथेरानमध्ये पर्यटकांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आली होती.त्यापैकी काही स्वच्छतागृहांच्या पाणीजोडण्या तोडण्यात आल्या आहेत. त्यात त्यातील एका स्वच्छतागृहावर झाड कोसळले आणि त्यामुळे नादुरुस्त झाले आहे. दुसरीकडे ती स्वच्छतागृह जुनी झाली असून नादुरुस्त स्वच्छतागृह तात्काळ हटवली जातील.
राजवर्धन आडे,
वनपाल माथेरान