माथेरानमधील स्वच्छतागृहांची तात्काळ दुरुस्ती
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात वन विभागाकडून प्रेक्षणीयस्थळी पर्यटकांच्या सोयीसाठी फायबरची स्वच्छतागृह उभारण्यात आली होती. ती नादुरुस्त झाल्याबद्दल कृषीवलमध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर माथेरान वन विभागाने तात्काळ त्या सर्व नादुरुस्त स्वच्छतागृह यांची दुरुस्ती केली असून, पूर्णपणे मोडकळीस आलेली स्वच्छतागृह हे तेथून हलविण्यात आली आहेत. दरम्यान, वन विभागाचे या तात्काळ कार्यवाहीमुळे पर्यटकांमध्ये आणि स्थानिक व्यावसायिक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
माथेरान हे पर्यटनस्थळ वन जमिनीवर वसले असून, या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी वनविभागाकडून काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वर्षातील बाराही महिने माथेरान पर्यटकांनी भरलेले असते. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी उभारलेली फायबरची स्वच्छतागृहे निकामी झाली होती. शारलोट लेक आणि एको पॉइंट या ठिकाणी असलेले स्वच्छतागृह गेली दोन वर्षे नादुरुस्त अवस्थेत पडून होती. त्यात त्या अर्धवट कोसळलेल्या स्वच्छतागृहांवर झाडेदेखील पडली आणि त्यामुळे स्वच्छतागृह ठेवलेला परिसरदेखील असुविधा यांच्यात सापडला होता. त्याबद्दल कृषीवलमध्ये सचित्र वृत्तान्त प्रसिद्ध करण्यात आला होता.
त्यानंतर वन विभागाने तात्काळ आपल्या वनमजुरांना शरलोट लेक आणि एको पॉइंट येथे पाठवले. त्या ठिकाणी झाड कोसळून पूर्ण नुकसान झालेल्या स्वच्छतागृहांना तेथून हटविण्यात आले. त्यानंतर सुस्थितीत असलेल्या दोन स्वच्छतागृहांची तात्काळ डागडुजी करून त्यांना सुस्थितीत आणण्यात आले. तर, मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांची रवानगी वन कार्यालयात हातगाडीमधून करण्यात आली. यासाठी वनक्षेत्रपाल उमेश जंगम यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तर, वनपाल राजवर्धन आढे तसेच वन कर्मचारी आणि वन मजूर यांनी ही कार्यवाही केली. वन विभाग आणि कृषीवल यांच्या सहकार्याबद्दल माथेरान निसर्ग पर्यटनस्थळ यांनी आभार मानले आहेत.