सरकार दलितविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी ओडिशाचे खासदार भर्तृहरी महताब यांची नियुक्ती केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला असून, संसदीय नियमांचा भंग होत असल्याचे म्हटले आहे. नियमानुसार सभागृहातील सर्वात ज्येष्ठ खासदार असलेल्या काँग्रेसचे केरळमधील खासदार कोडीकुन्नील सुरेश यांची नियुक्ती व्हायला हवी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. ओडिशाचे महताब हे सात वेळा, तर केरळचे सुरेश हे आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. सुरेश यांची नियमाप्रमाणे हंगामी अध्यक्षपदी निवड न झाल्यामुळे काँग्रेसने केंद्र सरकारवर दलित विरोधी असल्याचा आरोप लावला आहे. खासदार सुरेश दलित असल्यामुळेच त्यांना बाजूला करण्यात आले, अशी टीका काँग्रेसने केली. या आरोपाला इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या सीपीआय (एम) नेही दुजोरा दिला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्णयामागे वरच्या जात समूहांचे राजकारण दिसून येते.