आदिवासींना दीड हजार रोपांचे वाटप
| रायगड | खास प्रतिनिधी |
पर्यावरण वाचवण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढे येत आहेत. पेण तालुक्यातील पाच आदिवासी वाड्यांतील नागरिकांना दीड हजार आंब्यांची कलमे देण्यात आली. त्या-त्या आदिवासी वाडीवर या आंब्याच्या कलमांची लागवड करण्यात येणार आहे.
टाटा रॅलीज इंडिया लिमिटेड, टाटा केमिकल्स सोसायटी फॉर रूरल डेव्हलपमेंट आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत पेण येथील मोतीराम तलावाशेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात सदर झाडे वाटप कार्यक्रम पार पडला. ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील दुर्लक्षित उंबरमाळ, केळीचीवाडी, तांबडी, काजूचीवाडी आणि खवसावाडी येथील 156 कुटुंबांना प्रत्येकी दहा झाडे देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने देवगड, राजापुरी, केशर आणि रत्ना या जातीच्या झाडांचा समावेश होता. 1560 कलमी आंब्याची झाडे तसेच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेकडून तीन हजार किलो गांडुळखत देण्यात आले. यावेळी टाटा रॅलीजचे तांत्रिक सल्लागार श्रीकांत म्हात्रे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, राजू पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, राजेश रसाळ, स्थानिक तरुण सुनील वाघमारे, नरेश कडू, यशवंत, ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र खाकर आदी मान्यवर उपस्थित होते.