। माथेरान । वार्ताहर ।
वर्षाऋतुमध्ये माथेरान सारख्या सुंदर पर्यटनस्थळाची भ्रमंती म्हणजे पर्यटकांना पर्वणीच असते. पावसाच्या सुरवातीला निसर्गाची वेगवेगळी रूपे येथे पहावयास मिळत असतात. मागील काही दिवसांपासून धुक्यात हरवलेले माथेरान सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे येथील निसर्गसौंदर्य आणखीनच खुलले आहे. येथील सर्वच पॉईंट वरून निसर्गाची वेगवेगळी रूपे पहावयला मिळत आहेत.
वर्षाऋतूमध्ये खर्या अर्थाने निसर्गाच्या चमत्काराची अनुभूती माथेरान या ठिकाणी पहावयला मिळते.सुरवातीच्या पावसात येथे धुक्यात हरवलेले माथेरान पर्यटकांना पहायला मिळत होते. मात्र, मागील आठवडाभर येथे पावसाने दडी मारल्यामुळे माथेरानचे निसर्गसौंदर्य आणखीन खुलले असून येथील प्रत्येक पॉईंट वरून निसर्गाची वेगवेगळी रूपे नयनरम्य देखावे येथे पहावयला मिळत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करताना वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. येथील निसर्गाची नयनरम्य रूपे न्याहाळताना येथे स्वर्गच जणू धर्तीवर उतरला असल्याची जाणीव होत असल्याचे पर्यटकांकडून बोलले जात आहे. पावसाने आठवडाभर उघडीप घेतल्याने माथेरानकर सुद्धा हे नयनरम्य, निसर्गसौंदर्य देखावे आपल्या नजरेत आणि मोबाईलच्या कॅमेर्यात कैद करण्यासाठी सकाळच्या वेळेत भटकंती करताना दिसत आहेत.