। अलिबाग । प्रमोद जाधव ।
जिल्ह्यामध्ये भाताची रोपे उगवली आहेत. मात्र पाऊस नसल्याने रोपांची वाढ होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पाण्याअभावी शेत कोरडी दिसत आहेत. शेतकर्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. यंदा पावसाअभावी लावणीची कामे लांबणीवर जाण्याची चिंता शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये यंदा 98 हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवडीचे नियोजन आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भात पेरणीला सुरुवात झाली. जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत ही कामे पुर्ण झाली. जिल्ह्यामध्ये भाताच्या एकूण क्षेत्रापैकी दहा टक्के क्षेत्रामध्ये म्हणजे 10 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणीची कामे पुर्ण झाली. जिल्ह्यातील काही भागात रिमझीम पाऊस पडल्याने भाताची रोपे चांगल्या पध्दतीने उगवली. काही ठिकाणी लावणी योग्य रोपे तयार झाली आहेत. तर काही ठिकाणी पावसाअभावी रोपांची वाढ होण्यास उशीर होत आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये भाताची रोपे पिवळी पडण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही जण फवारणीद्वारे रोपांना पाणी घालत आहेत.
भात लावणीसाठी रोपे तयार झाली असताना पावसाअभावी ही कामे लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली आहे. शेतांमध्ये पाणी नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकर्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून पावसाने सुरुवात केली. हा पाऊस असाच सुरु राहिल्यास लावणीची कामे तातडीने सुुरू होणार आहे.
मजूरकरांची समस्या निर्माण होण्याची शक्यता भाताची रोपे तयार झाली आहे. लावणीच्या कामाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. मात्र पाऊस नसल्याने ही कामे लांबणीवर जातील. त्याचा परिणाम शेतकर्यांना बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पाऊस सुरु झाल्यावर सर्वजण लावणीची कामे सुरु करतील त्यामुळे मजूरकर मिळणे कठीण होणार आहे. मजूरकरांचा तुटवडा जाणवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मजुरीचे दर वाढण्याची शक्यता लावणीच्या कामासाठी दिवसाला सुमारे साडेतीनशे रुपये मजूरी दिली जाते. मात्र, लावणीची कामे लांबणीवर गेल्यावर मजूरकर मिळताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे मजुरीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भात बी लागवडीनंतर रोपे तयार झाली आहेत.अनेक ठिकाणी लावणी योग्य रोपे झाली आहेत. मात्र पाऊस नसल्याने लावणीची कामे थांबली आहेत. लावणी लांबणीवर गेल्यास मजूरकर मिळणे कठीण होणार आहे. त्यात मजूरीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
सतिश म्हात्रे, शेतकरी