वनखात्याच्या कामगिरीवर ग्रामस्थांची नाराजी
| महाड | वार्ताहर |
महाडजवळील केंबुर्ली गावात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, बिबट्याने कुत्र्यांना व पाळीव प्राण्यांना लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागत आहे. याबाबत वनखात्याला वारंवार निवेदन देऊनदेखील वन खाते मात्र कोणतीच दखल घेत नसल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत.
महाडजवळील केंबुर्ली गावात दररोज रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर सुरू आहे. बिबट्याने पाळीव प्राण्यांना लक्ष केले असून, त्याचबरोबर गावातील कुत्र्यांना ठार मारण्याचा प्रयत्न चालू केला आहे. यामुळे गावातील नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत. केंबुर्ली गावात 13 मे रोजी अचानक पडलेल्या पावसामुळे वीज प्रवाह खंडित झाला होता. त्यावेळेला याच गावातील विलास कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. यावेळी गावातील पोलीस पाटील यांनी 20 मे रोजी वन खात्याला निवेदन दिले होते, तरीदेखील वन खात्याने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे केंबुर्ली गावातील ग्रामपंचायतीने अखेर चार जून रोजी पुन्हा एकदा वनखात्याला निवेदन देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. मात्र, वनखाते कोणतेही लक्ष देण्यास तयार नसल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत.
महाडचे वनखाते नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यास तयार नसल्याने गावात पुन्हा एकदा गावातील जयदास पवार यांचा कुत्रा त्यांच्या घरातील टेरेसवर बांधला असताना टेरेसवर येऊन बिबट्याने रात्रीच्या वेळेस कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार मारले. त्यामुळे या गावातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.