संतोष कदम यांच्याकडून हिशोबाची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानमध्ये ब्रिटिशांनी बांधलेल्या शारलोट लेक तलावामधील गाळ पूर्वी नगरपरिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काढायचे. यानंतर मागील दहा वर्षात एकदाही गाळ काढला गेला नाही, म्हणून माथेरानमधील संतोष कदम यांनी गाळ काढण्याच्या मागणीसाठी दोन वेळा उपोषण केले आहे. तलावाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र सरकारच्या अमृत 2 मधून निधी मंजूर झाला आहे. पालिकेने याकामासाठी निधी खर्च केला असूनही या शारलोट तलावाची परिस्थिती जैसे थेच आहे. यामुळे पालिकेकडून निधीचा अपहार केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे.
मागील आठवड्यात उपोषणासाठी बसले असता त्यावेळी जीवन प्राधिकरणाकडून तलावाच्या सुशोभीकरणासाठी 2023 मध्ये केंद्र सरकारच्या अमृत 2 मधून 3.66 कोटींचा निधी मंजूर झाला आहे, असे पत्र देण्यात आले होते. मात्र, त्या पत्रात तब्बल 3 कोटी रुपये दोन टप्प्यात वर्ग झाले असल्याचे नमूद केले आहे. त्यावर उपोषणकर्ते संतोष कदम यांनी ते दोन कोटी कोणत्या कामावर खर्च केले, असा प्रश्न केला. मात्र, नगरपरिषद प्रशासनाकडून आपण लवकरच निविदा काढणार असून निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर टेंडर निघेल, असे आश्वासन देत आहेत. मात्र, पालिका काढणारे टेंडर हे 1कोटी खर्च कामाचे आहे. त्यामुळे 2 कोटींचे निधीमधून कोणती कामे झाली आहेत हे एकदा पालिकेने स्पष्ट करायला हवे, असे मत उपोषणकर्ते संतोष कदम यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी एक सदस्यीय समितीचे प्रमुख जनार्दन पारटे म्हणाले की, केंद्र सरकारचे अमृत 2 मधील 3.66 कोटी मधील 2 कोटी पालिकेने खर्च केले आहेत. तर, त्या निधीतून शारलोट लेक तलावाच्या संवर्धनाची कामे करण्यासाठी जे टेंडर काढले आहे ते टेंडर कधी काढले, कोणत्या कंपनीने ठेका मिळवून काम केले आहे, अशी माहिती पालिकेने देण्याची गरज आहे. मंजूर असलेल्या निधीतून कोणती कामे केली गेली याची माहिती येथील नागरिकांना मिळायला हवी. त्यासाठी आमचा कायम पाठपुरावा राहणार असून शासनाचे 2 कोटी कोणाच्याही घशात घातले जाणार नाहीत, अशी आमची ठाम भूमिका आहे. पालिकेने शारलोट लेकचे संवर्धन करताना केवळ गाळ काढण्याची कामे करू नयेत तर तलावाच्या तीन बाजूला जंगलात गाबियन वॉल बसवून जंगलाचे संवर्धन करण्याची गरज आहे. यामुळे पाण्याचा साठादेखील वाढेल आणि धरणाचे आयुष्यमान वाढण्यास मदत होईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे जनार्दन पारटे म्हणाले आहेत.