अलिबाग । प्रतिनिधी ।
मान्सून सुरू होऊनही रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर दिसत नव्हता परंतु रविवारी रात्री पावसाने रायगड जिल्ह्यात मुसळधार सुरुवात केली आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. महत्वाच्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर काही ठिकाणी नद्यांना पूर आला. यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाने अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड नदीने पुररेषा ओलांडल्याने रामराज , भिलजी आदी गावांना पुराचा तडाखा बसला आहे. रामराज नजीकच्या नदीवरील पुलावर पाणी आल्याने रामराज गावाचा संपर्क तुटला होता.
रविवारी रात्री अलिबागसह रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली. यामुळे काही तासातच रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी जमा झाले होते. रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी वाढली होती. सर्वाधिक फटका अलिबाग तालुक्याला बसला आहे. अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड खोऱ्यात मुसळधार पाऊस पडल्याने या नदीला महापूर आला होता. आलेल्या पुराने रामराज परिसरातील रामराज मोहल्ला , मराठा आळी , कोळीवाडा येथील घरांमध्ये पाणी शिरले. भिलजी गावातील माऊली मंदिर परिसरातील घरांमध्ये आणि चारचाकी वाहनांमध्ये पाणी शिरले. महानवाडी महान , रामराज , उमटे, नांगरवाडी , ताजपुर , भोनग, बापळे आदी गावांमधील शेती पाण्याखाली गेली होती.
रात्रभर पाऊस पडल्याने अलिबाग एसटी आगार , रामनाथ , तळकर नगर , चेंढरे , अलिबाग बायपास , सेंट मेरी स्कुल या परिसरात पाणी साचले होते. सकाळी शाळांमध्ये मुले हजर झाली. परंतु एक तासातच जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला यामुळे अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील शाळा आणि शिकवण्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान किनारपट्टी , खाडी आणि नदी किनारी असणाऱ्या गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.