आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपत्र प्रदान
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या शहर अभियंता या पदावर कार्यरत असणारे संजय कटेकर यांना पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रियाशील प्रेस क्लब पनवेलच्यावतीने गौरविण्यात आले. यावेळी संजय कटेकर यांच्या 32 वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचा प्रवास मांडणार्या लेखाची फ्रेम देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी क्रियाशील प्रेस क्लब पनवेलचे संस्थापक अध्यक्ष तथा वादळवाराचे संपादक विजय कडू, अध्यक्ष तथा पुण्यनगरीचे पत्रकार साहिल रेळेकर, सरचिटणीस तथा रत्नागिरी (रायगड) टाइम्सचे पत्रकार राज भंडारी, अभेद्य प्रहार वृत्तपत्राचे संपादक प्रकाश म्हात्रे, दैनिक प्रहारचे पत्रकार चंद्रकांत शिर्के, साप्ताहिक रायगड संदेशचे संपादक विशाल सावंत, रायगड टुडे व वादळवारा लाईव्ह चॅनेलचे संपादक क्षितिज कडू आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी आयुक्त मंगेश चितळे हे संजय कटेकर यांची प्रशंसा करताना म्हणाले की, संजय कटेकर यांची प्रशासकीय कारकीर्द समस्त भूमीपुत्रांसाठी प्रेरणादायी आहे. ते शहर अभियंता व्हावेत ही भूमीपुत्रांची पूर्वीपासूनच इच्छा होती. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तर ज्येष्ठ पत्रकार विजय कडू म्हणाले की, संजय कटेकर यांचा तत्कालीन पनवेल नगरपालिकेच्या काळातील कनिष्ठ अभियंता ते आज महापालिकेच्या काळातील मुख्य अभियंता हा प्रवास मी अत्यंत जवळून पाहिला आहे. त्यांच्या या गगनभरारीमुळे भूमीपुत्रांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.