| चिरनेर | प्रतिनिधी |
गेले दोन ते तीन दिवस उरण तालुक्याला पावसाने झोडपले असून, त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जनतेवर झाला असून, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील नदी नाल्यांना पूर येऊन उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, मोठीजुई, विंधणे, दिघोडे, आवरे, गोवठणे, पाले, पिरकोन, खोपटे, चाणजे, नागाव, केगाव आदी भागातील काही शेतकर्यांच्या शेताच्या बांधांना खांडी जाऊन, पाणी भातशेतीत घुसले आहे. त्यामुळे भात शेतीतील रोपे कुजून जाण्याची शक्यता आहे. तर पाण्यासोबत वाहून आलेल्या गाळाखाली रोपे गाडली जाण्याची शक्यता काहीशी निर्माण झाली आहे.
भातशेतीत पाणी शिरल्यामुळे शेतीची कामे ठप्प होऊन, लावण्या खोळंबल्या आहेत. नांगरणीची कामे देखील थांबली आहेत. त्यातच गेल्या आठवडाभरापासून, खताचा तुटवडा, मजुरांचा अभाव आणि पावसाचा कहर यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने, पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.