एकविरा आई मंदिर परिसरातील संपूर्ण पायर्यांची स्वच्छता
। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथील नवरात्रौत्सव मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत आतापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहीम, पूरग्रस्तांना मदतीचा हात आदींचा समावेश आहे. दरम्यान, नुकतेच कार्ला येथील एकविरा आईच्या गडावर स्वच्छता मोहीम राबवून गड परिसर आणि पायर्यांची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मंडळाचे जवळपास वीसहून अधिक सदस्य सहभागी झाले होते.
रांजणखार नाका नवरात्रौत्सव मंडळाच्यावतीने आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवला आहे. मंडळातील सभासदांनी एकत्र येत आतापर्यंत अनेक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यामध्ये दरवर्षी वृक्षारोपण मोहीम हाती घेऊन वृक्षसंवर्धनाविषयी जनजागृती समाजामध्ये करण्यात येते. तसेच रक्तदान हेच श्रेष्ठदान यानुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन आतापर्यंत शेकोडो बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले असून, समाजामध्ये रक्तदानाविषयी प्रबोधन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून याठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे महाड येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत त्यांच्या घरांतील चिखल, माती काढून स्वच्छतेबरोबरच पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप केले आहे. मंडळाच्या या सामाजिक बांधिलकी जपणार्या उपक्रमांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक करण्यात आले आहे.
दरम्यान, मंडळाच्या वतीने एकविरा गड परिसर आणि पायर्यांवरील कचरा गोळा करुन साफसफाई करण्यात आली. तसेच गोळा करण्यात आलेल्या कचर्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. या श्रमदान मोहिमेत राजेंद्र पाटील, दिलीप पाटील, गंगाधर (हाशिवरे), समीर पाटील, जितेंद्र पाटील, मनोज पाटील, परेश पाटील, अखिलेश, सदन, अतिश, संदीप, नंदकुमार आदी सदस्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. या श्रमदान मोहिमेचे नियोजन रांजणखार येथील पाटील ट्रेडर्स यांच्याकडून करण्यात आले होते. श्रमदानाच्या वेळी अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे शुभेच्छा देत कामाचे कौतुक केले.