निवारा बालगृहास दिली सदिच्छा भेट
| बीड | प्रतिनिधी |
केज येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड तसेच त्यांचे सहकारी अॅड. नारायण गोले पाटील यांनी रविवारी, (दि.14) जुलै रोजी निवारा बालगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अनाथांसाठी अरुण जाधव यांचे योगदान अनमोल आहेत, असे उद्गार काढले.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह, मोहा फाटा (समता भूमी) ता. जामखेड, जि. अहमदनगर या ठिकाणी अनाथ, निराधार, वंचित, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार, लोककलावंत, भटके-विमुक्त, दलित, आदिवासी घटकातील 90 मुला-मुलींच्या शिक्षणासाठी गेले आठ वर्षांपासून हा प्रकल्प चालवला जातो. या बालगृहाला शासनाची कोणतीही मदत मिळत नसून, हे बालगृह संपूर्णपणे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून व लोकवर्गणीतून चालवले जात आहे. या बालगृहातील आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री. गुंड म्हणाले की, मला या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटले व या मुलांकडे पाहिल्यानंतर मला माझ्या शाळेची आठवण झाली. अरुण आबा तुम्ही जे या गोरगरिबांसाठी काम करतात, त्याचे मोल कशातच करता येणार नाही, ज्या मुलांना आई-बाबा माहीत नाहीत, त्या मुलांचे आई-बाबा होण्याचे काम आबा तुम्ही करतात, कारण कोल्हाटी समाजामध्ये असा हिरा चमकणारा म्हणजे फक्त आबा तुम्हीच आहात. स्वतःसाठी जगणारी तर खूप आहेत; पण तुम्ही स्वतःसाठी जगता-जगता इतरांसाठी जगतात, त्यामुळे मी व माझे सहकारी तुमच्या कार्याला सलाम करतो. या बालगृहात शिकणार्या मुलांनी मोठे होऊन चांगले शिक्षण घेऊन अधिकारी बनलेले आम्हाला पाहावयाचे आहे, तरी पुढील काळामध्ये बालगृहातील मुलांना शिक्षणासाठी जी काही मदत लागेल, ती मला सतत कळवावी, तसेच या बालगृहाच्या पुढील वाटचालीस त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेची संपूर्ण माहिती संस्थेचे संस्थापक अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी दिली. प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मुस्लिम पंच कमिटी जामखेडचे नेते अझहर भाई काझी, पत्रकार मोहिद्दीन तांबोळी, भाई अशोक रोडे, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, सचिन भिंगारदिवे, ऋषिकेश गायकवाड, तुकाराम शिंदे, संगीता केसकर, सुरेखा चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.