। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील सानेगाव आणि म्हसळ्यामधील दोन शाळकरी मुला-मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामध्ये सानेगाव आश्रम शाळेतील मुलगी व म्हसळा येथील शाळेतील मुलगा असे दोघांना पळवून नेल्याची तक्रार रोहा व म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रामराज परिसरातील खैरवाडी येथील ही मुलगी असून ती सानेगाव आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे. रविवारी (दि.14) दुपारी आश्रम शाळेतून घरी जात होती. दरम्यान सानेगाव स्थानकाजवळ ती थांबली होती. तिच्यासोबत तिची आईदेखील होती. परंतु भाचीला आणण्यासाठी तिची आई तिला स्थानकाजवळ ठेवून पुन्हा आश्रम शाळेत गेली. याचा फायदा घेत कोणीतरी त्या मुलीचे अपहरण केले. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात आईने तक्रार दाखल केली असून पोलीस नाईक सूनील शिरसाठ अधिक तपास करीत आहेत.
शाळकरी मुलगा हा म्हसळा येथील रहिवासी आहे. मंगळवारी (दि.16) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारा तो शाळेत जातो, असे घरात सांगून गेला. संध्याकाळ होत आली तरीही तो घरी पोहचला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी शाळेत विचारणा केली. आजूबाजूला विचारणा केली, तरीही तो मुलगा सापडला नाही. अखेर कोणीतरी त्याचे अपहरण केल्याचा आरोप करीत पालकांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एडवळे अधिक तपास करीत आहेत.