| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागेतील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासकिय इमारतीला झुडपांनी विळखा घातला आहे. हे झुडूप काढण्यास प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाजूलाच प्रशासकिय इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर बाह्य रुग्ण कक्ष असून या विभागामार्फत वेगवेगळ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले जाते. पहिल्या मजल्यावर जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय आहे. बाजूलाच कर्मचाऱ्यांचे कार्यालय आहे. दुसऱ्या मजल्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचे कार्यालय आहे. या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांची सतत वर्दळ असते.
तसेच, रुग्णालयात स्वच्छता राहवी यासाठी शल्यचिकित्सक यांनी प्रयत्न केले. रुग्णालयातच्या आवारात येणाऱ्या वाहनांमुळे गर्दी होऊ नये यासाठी वाहन पार्कींग व्यवस्था करण्यात आली. मात्र, रुग्णालयाच्या या इमारतीला झुडपांनी विळखा घातल्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पहिल्या मजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत ठिकठिकाणी लहान मोठी झुडपेे या इमारतीवर उगवली आहेत. ही झुडपे काढण्यास प्रशासन उदासीन ठरल्याने ती झपाट्याने वाढू लागली आहेत. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला
जात आहे.