तिसर्या दिवशी चार संघ उपांत्य फेरीत दाखल
। पुणे । प्रतिनिधी ।
71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पुरुष व महिला गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तिसर्या दिवशी पुरुषांच्या पहिल्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात नंदुरबार, पुणे शहर, पुणे ग्रामीण व अहमदनगर संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
बाणेर येथील बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्तविद्यमाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 71 व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पुरुष गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी ‘सतेज करंडक’ स्पर्धेच्या तिसर्या दिवशी पुरुषांच्या पहिल्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात नंदुरबार संघाने कोल्हापूर संघावर 31-24 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला नंदुरबार व कोल्हापूर 11-11 अशा समान गुणांवर होते.
मध्यंतरानंतर नंदुरबारच्या वरुण खंडाळे यांने चौफेर आक्रमण करीत विजय मिळविला. दुसर्या सामन्यात पुणे शहर संघाने तुल्यबळ पालघर संघावर 60-44 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे शहर संघाकडे-21 अशी आघाडी होती. पुणे शहर संघाच्या तेजस पाटील, शुभम शेळके व सुनिल दुबिले यांनी चौफेर हल्ला करीत पालघरचा बचाव भेदत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
उपांत्य पुर्व फेरीच्या अत्यंत अटितटीच्या तिसर्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई उपनगर पुर्व संघावर 37-33 अशी मात केली. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघ 9-18 असा पिछाडीवर होता. मात्र, पुणे ग्रामीण संघाच्या अजित चौहान, तेजस काळभोर, अक्षय सुर्यवंशी यांनी मध्यंतरानंतर जबरदस्त आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा सामना निर्धारित वेळेत 29-29 अशा समान गुणांवर संपला. त्यामुळे हा सामना पाच-पाच चढायांवर खेळला गेला. पाच चढायांमध्ये पुणे ग्रामीण संघाने 8 गुण मिळविले तर मुंबई उपनगर पुर्व संघाने 4 गुण मिळविले. त्यामुळे अंतिम गुण संख्या पुणे ग्रामीण 37 व मुंबई उपनगर पुर्व संघाने 33 गुण मिळविले.
उपांत्य फेरीच्या चौथ्या सामन्यात अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात अहमदनगर संघाने पिंपरी चिंचवड संघावर 37-34 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला अहमदनगर संघाकडे 19-10 अशी आघाडी होती. अहमदनगर संघाच्या प्रफुल झावरे व शिवम पठारे या खेळाडूंनी उत्कृष्ठ चढाया करीत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.