पुढील उपचारासाठी पुण्यास रवाना
| उरण | वार्ताहर |
चिर्ले येथील मानवी वस्तीत जखमी अवस्थेत पिसुरी हरिण आढळून आले होते. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी या जखमी पिसुरी हरिणाला ताब्यात घेऊन उरण वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर पुणे येथे पाठविण्यात आले.
चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर भागात स्थानिक ग्रामपंचायत, महसूल व वन विभाग यांच्या साटेलोटे कारभारामुळे कंटेनर यार्ड, गोदाम, दगड खाणी व्यावसायिकांनी शिरकाव केल्याने वन्यजीव मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. त्यातच समवेदा सावला यार्डजवळ एक वेगळा असा दिसणारा प्राणी तेथील कामगार प्रथमेश मढवी यांनी पाहिला. मात्र, त्या प्राण्याची ओळख नसल्याने चिर्ले येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र नितीन मढवी यांना या प्राण्याची माहिती दिली. नितीन मढवी व त्याचे सहकारी रोहित पाटील, ऋषभ पाटील, कुणाल घरत, कुंदन पाटील यांनी लगेचच घटनास्थळी हजर राहून त्या जखमी प्राण्याला पकडले. त्यानंतर वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांना माहिती दिली. या प्राण्याची ओळख पिसुरी हरीण असून, तो दुर्मिळ असल्याचे विवेक केणी यांनी सांगितले.
दुर्मिळ प्राण्याची माहिती वन्यजीव निसर्ग संस्थेने वनविभागाचे उरण अधिकारी नथुराम कोकरे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी पाठविल्यात आले. यावेळी वनवीभाचे वनरक्षक संतोष इंगोले, राजेंद्र पवार, अनिकेत झेंडे, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य महेश भोईर, नितीन मढवी, सुमित मढवी, सिद्धार्थ मढवी, मनीष मढवी, प्राणी पक्षी निरीक्षक निकेतन ठाकूर आदी उपस्थित होते.






