घरांसह स्मशानभूमी शेडची पडझड, दोघांचा बुडून मृत्यू
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीचा फटका अलिबाग, तळा, पेण, महाड, माणगाव, पोलादपूर या सात तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला. त्यामध्ये काहींच्या घरांसह गोठ्यांची पडझड झाली असून, दोघांचा ओढ्यात, धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झाला.
जिल्ह्यात 21 व 22 जुलै रोजी एक हजार 534.60 मि.मी. पाऊस पडला. मागील 24 तासांत महाड, म्हसळा, पोलादपूर, माथेरान, तळा, श्रीवर्धनमध्ये 102 ते 155 मि.मी. पाऊस पडला असून, उर्वरित तालुक्यात 100 मि.मी.पेक्षा कमी पाऊस पडला. सावित्री नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने महाड शहर व परिसरातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला होता. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, पाऊस कमी झाल्यावर हा धोका कमी झाला. सतत सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात 13 घरांची पडझड झाली आहे. त्यात अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील जनाबाई पाटील, तळा तालुक्यातील चरई लालमाती आदिवासीवाडीमधील गोपाळ हिलम, पेणमधील बोरी येथील पांडुरंग म्हात्रे, कृष्णा म्हात्रे, महाडमधील नेराव येथील अनुसया कोरपे, पार्वती कोरपे, निगडे येथील सुलोचना मोरे, माणगावमधील कोल्हाण येथील अजित कदम, अर्चना पावसकर, पोलादपूरमधील ओंबळी येथील कृष्णा चिकणे, ज्ञानदेव चिकणे, देवपूरमधील सुरेश पवार, पार्ले येथील विठ्ठल गोगावले, निवे येथील मोहन तळेकर, सुधागड तालुक्यातील महागाव भोप्याची वाडी येथील हिरामण पवार यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तसेच पोलादपूरमधील देवपूरवाडी येथे अनेकांच्या घरात पाणी शिरले. महाडमधील पांगारी येथील स्मशानभूमीच्या शेडचे नुकसान झाले आहे. सावित्री धरण, रानबाजीरेशेजारील पोलादपूर ते रानवडी वडाचा कोंड या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीला तात्पुरता बंद करण्यात आला.
सतत सुरु असलेल्या पावसामुळे गावांना दरडीचा धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने तात्काळ दखल घेत पोलादपूर तालुक्यातील 15 गावांमधील 193 कुटुंबांतील 540 व्यक्तींचे स्थलांतर केले. या मुसळधार पावसामुळे नदी, तलाव, धरणे पाण्याने तुडूंब भरली होती. धबधबे, ओढे पाण्याने ओसंडून वाहत होते. महाडमधील कलकत आदिवासी वाडीकडे जाणार्या कच्च्या रस्त्याला वाहणार्या ओढ्यात बुडून 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. आमशेत येथील 22 वर्षीय तरुणाचा सातसडा धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
65 टक्क्यांहून अधिक पाऊस कोसळला
रायगड जिल्ह्यात सात जुलैपासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. भातलावणीची कामेदेखील अंतिम टप्प्यात आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 65.20 टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण पर्जन्यमान 49 हजार 622.51 मि. मी. इतके आहे. त्यापैकी 32 हजार 355.94 मि.मी. पाऊस आतापर्यंत पडल्याची माहिती जिल्हा प्रशासाकडून देण्यात आली.
धरणांमध्ये 91 टक्के जलसाठा
रायगड जिल्ह्यामध्ये 28 धरणे आहेत. गेली अनेक दिवस जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे धरणेदेखील पाण्याने भरू लागली आहेत. जिल्ह्यातील 22 धरणे शंभर टक्के फुल्ल असून, अलिबागमधील श्रीगाव, श्रीवर्धनमधील कार्ले, रानिवली, कर्जतमधील साळोख, अवसरे, उरणमधील पुनाडे या धरणांमध्ये 42 टक्क्यांपासून 79 टक्के जलसाठा असल्याची माहिती कोलाड येथील पाटबंधारे विभागाने दिली.