। चिरनेर । प्रतिनिधी ।
जेएनपीए बंदरातील कामकाज सुरळीत चालू असून जून महिन्यात बंदरात सर्वाधिक कंटेनर हाताळणी करण्यात आली आहे. तर, बंदरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी नसल्याचा दावा मंगळवारी (दि.23) झालेल्या जेएनपीए प्रशासन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी केली आहे.
बंदरात ये-जा करण्यासाठी खड्डेमुक्त रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे बंदरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात आली आहे. मात्र, जगातील इतर देशातील बंदरात जहाजे रोखण्यात आली होती. तशी परिस्थिती जेएनपीएमध्ये नव्हती. उलट अडचण असतानाही जहाजे परत न पाठविता ती बंदरात घेऊन हाताळणी करण्यात आली. त्यामुळे बंदरात कंटेनर वाहने थांबतील अशी स्थिती नसल्याचा दावा अध्यक्षांनी यावेळी केला. तर, बंदराच्या वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी वाहनतळ तयार करण्यात आले आहे. याशिवाय पुढील काळात रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येणारी वाहने यांच्यावर कारवाई सुरू करणार. तसेच, वाहनतळ परिसरातील अनधिकृत बांधकामावरही कारवाई करण्यात येणार असल्याची महिती त्यांनी दिली.
त्याचप्रमाणे बेलपाडा मार्गे एक नवा मार्ग, शेतकर्यांच्या नाशवंत मालाची साठवणूक आणि प्रकिया करणारे केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक व उत्तर भारतातील राज्यातील शेतकर्यांना लाभ होणार आहे. त्यासाठी 300 कोटींच्या कामाची निविदा काढण्यात आल्याची माहिती उन्मेष वाघ यांनी दिली आहे.