। माणगाव । प्रतिनिधी ।
राज्यातील सर्व शिधावाटप, रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय्य हक्क मागण्यांची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणार्या दैनंदिन अडीअडचणींची सोडवणूक करण्याबाबत अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेनी शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन लक्ष वेधले होते.
त्या मागण्यांची पूर्तता शासनाकडून झाली नसल्याने तसेच धान्य वितारणामध्ये येणार्या दैनदिन अडचणींची सोडवणूक करण्याबाबत माणगाव तहसील कार्यालयासमोर रायगड जिल्हा व माणगाव तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माणगाव नायब तहसीलदार तथा माणगाव तालुका पुरवठा अधिकारी संजय माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, माणगाव तालुकाध्यक्ष अनिल मोरे, वसंत साठे, निलेश कासरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.







