1 ऑगस्टला मासेमारीवरील बंदी उठणार
| रायगड | प्रतिनिधी |
दोन महिन्याची मासेमारी बंदीची मुदत 31 जुलैला संपत आहे. त्यानंतर नव्या हंगामाला जोमाने सुरुवात करण्यासाठी जिल्ह्यातील मच्छीमार सरसावले आहेत, मात्र सध्याच्या वादळी हवामानाने त्यांच्यात चिंतेत भर टाकली आहे.
सध्या बंदरात नौकांची डागडुजी, रसद जमा करण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू आहे. बंदी कालावधीत सुटीनिमित्त गावाकडे गेलेले खलाशी परतू लागले आहेत. त्यामुळे दोन महिने शुकशुकाट असलेल्या बंदरांतील वर्दळ वाढली आहे, मात्र पावसाने अद्याप उसंत न घेतल्याने वादळवाऱ्यामुळे मच्छीमारांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी कामगार येतात. उरण तालुक्यातील मोरा, करंजा, अलिबाग तालुक्यातील वरसोली, नागाव, अलिबाग कोळीवाडा येथे या कामगारांनी वसाहती केल्या आहेत. सुटीनिमित्त गावाकडे गेलेले कामगार पुन्हा दाखल होऊ लागले आहेत.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात 40 हजारच्या आसपास परप्रांतीय कामगार असून दरवर्षी ही संख्या वाढते. सर्व कामगारांना आपल्या मूळ गावातील रेशनकार्ड, निवडणूक कार्ड, आधारकार्ड होडी मालकाला आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडे ओळख म्हणून द्यावे लागणार आहेत. राजपुरीसह एकदरा, कोळीवाडा जुना पाडा व नवापाडा मुरूड, नांदगाव व मजगाव, बोर्ली, कोर्लई मिळून लहान-मोठ्या होड्यांची संख्या 500 च्या घरात आहे. येथील मच्छीमार जाळ्यांची दुरुस्ती, होड्यांची डागडुजी, रंगरंगोटी तसेच इंजिनचे मेंटेनन्स करण्यात व्यग्र आहे. सुतारकाम करणाऱ्यांना चांगला रोजगार मिळत आहे.
एक सिलिंडरची होडी नव्याने तयार करण्यासाठी किमान चार लाख तर सहा सिलिंडरच्या होडीसाठी सुमारे 35 ते 40 लाख भांडवलाची उभारणी करावी लागते.एनसीडीसीतर्फे केंद्र सरकारतर्फे होड्यांवर कर्ज दिले जाते. परंतु मासळीचा दुष्काळ असल्याने बँकेचे हप्ते भरण्यात अडचणी येत असल्याने जप्तीची नामुष्की आली आहे. मच्छीमार होडीवर नाखवा (मालक), तांडेल (कप्तान) व खलाशी (कामगार) मिळून 12 ते 15 व्यक्ती दिमतीला घ्यावे लागतात. मासेमारी बंदी कालावधीतही त्यांना पगार द्यावा लागत असल्याने होडी मालकांचे आर्थिक गणिते बिघडत आहे.