। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकण रेल्वे मार्गावरुन गणेशोत्सव काळात 15 दिवसांकरीता मालगाड्यांची वाहतूक बंद करण्यात यावी. या मालगाड्यांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी. या मार्गावर गणेशोत्सवाकरीता अप डाऊन किमान 100 फेर्या सोडल्या जाव्यात, अशी मागणी उध्दव ठाकरे सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाकरिता 1 ते 18 सप्टेंबर दरम्यान कोकण रेल्वेने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गे गणपती उत्सव विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदाही गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्याचे प्रवासी आरक्षण फुल्ल झाले असून प्रत्येक गाडीला वेटिंग लिस्ट आहे. कोकण रेल्वे मार्गावर उत्सव कालावधीत अजुन जादा गाड्या सोडता येत नाहीत. हे कारण रेल्वेकडून नेहमी सांगितले जाते. कारण ट्रॅक व्यस्त असल्याने आणि क्षमता संपल्याने आणखी अतिरिक्त गाड्या सोडता येत नाहीत. उत्सव काळातील 15 दिवसांमध्ये मालगाड्या पूर्णतः बंद करुन त्यांची वाहतूक पर्यायी दुसर्या मार्गाने वळवून त्या जागी किमान अप डाऊन 100 फेर्या सोडल्या जाऊ शकतात.