| पॅरिस | वृत्तसंस्था |
भारताच्या धीरज बेम्मादेवरा आणि अंकिता भकत या जोडीने तिरंदाजीच्या मिश्र गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने या कामगिरीसह इतिहास रचला आणि पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. आजच सायंकाळी सेमी फायनल होणार आहे.
धीरज आणि अंकिता यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या दिआनंद कोइरुनसिमा आणि अरिफ पेंगस्तू यांना 5-1 गुणांच्या फरकाने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडीने 37-36 अशा एका पाँइंटच्या फरकाने आघाडी घेतल्याने त्यांना 2 गुण मिळाले. दुसरा सेट 38-38 असा बरोबरीत राहिल्याने दोन्ही जोड्यांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. त्यानंतरच्या तिसऱ्या सेटमध्ये 38-37अशा फरकाने भारताने आघाडी घेतली आणि 2 गुण मिळवले. त्यामुळे अंकिता आणि धीरज यांनी विजय निश्चित केला.
उपांत्यपूर्व फेरीत अंकिता आणि धीरज यांचा सामना स्पेनच्या एलिया कॅनालेस आणि पाब्लो गोन्झालेज अछा या जोडीविरुद्ध झाला. स्पेनच्या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत चीनचा पराभव केला होता. भारतीय जोडीने पहिल्या सेटमध्ये 38-37 असा विजय मिळवून दोन गुण पदरात घातले. पण स्पॅनिश जोडीने दुसऱ्या सेटमध्ये 38-38 असे बरोबरीचे गुण घेत 1-1असे समान गुण खात्यात घातले आणि तिसऱ्या सेटमध्ये दोन गुण घेत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. चौथ्या सेटमध्ये 38-37 अशा नेम साधून भारतीय जोडीने 5-3 अशी आघाडी केली आणि उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली आहे.