| सातारा | वृत्तसंस्था |
साताऱ्यात ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोरडे घाटात डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका मुलीचा तोल गेला आणि ती 250 फुट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, 40 फुटावर एका झाडात अडकली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले. तिला साताऱ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या तरुणीचा जीव वाचला असला तरी तिला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. या भागात संततधार पाऊस सुरू असल्याने जमीन अतिशय निसरडी झाली आहे, त्यामुळे ही घटना घडली. ठोसेघर सज्जनगड परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे आणि सध्या पावसाच्या सरी कोसळत असल्याने अनेक पर्यटक इथे येतात. निसर्गसौंदर्यामुळे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही, मात्र काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा, एक सेल्फी जीवावर बेतू शकते. सुदैवाने, या तरुणीचे प्राण वाचले आहेत, पण सेल्फीचा मोह किती धोकादायक ठरू शकतो याचे हे उदाहरण आहे.