। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ जवळील पिंपळोली ग्रामपंचायत हद्दीतील आंथ्रट गावामध्ये नागरिकांना मृतदेह उघड्यावर जाळण्याची नामुष्की ओढवले असल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर देखील परिस्थिती असल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आंथ्रट गावातील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेहदेखील उघड्यावर भर पावसात जाळण्याची वेळ आली. ग्रामपंचायत प्रशासन तसेच इतर शासकीय यंत्रणा यांना जाब विचारण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. गेली अनेक वर्ष उघड्यावर मृतदेह जाळून मरणानंतर देखील यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमी शेड नसल्याने ग्रामस्थांनी आता प्रशासनाला धारेवर धरले आहे. ठेकेदाराने मंजूर असलेले काम करण्याची तयारी दाखवलेली असतानादेखील काही स्थानिकांकडून या कामांमध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप केला गेला आहे. राजकीय विरोधातून हे आरोप होत असल्याचं स्थानिकांचा म्हणणं आहे. मात्र असे असताना सर्वांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पिंपळोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मारुती थोरवे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रस्तावित स्मशानभूमीचे काम हे जागेच्या अडचणीमुळे थांबवले असल्याची माहिती दिली.उपस्थित ग्रामस्थांमध्ये माजी ग्रामपंचायत माजी सरपंच राजाराम डायरे यांनी हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास यावं आणि त्याकरता आम्ही सहकार्य करणार असल्याचं म्हटले आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.