। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील मासळी वाहतुकीवरील बंद झालेली कर आकारणी पुन्हा सुरू करण्याबाबतचे नियोजन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केले जात आहेत. त्यामुळे मच्छीमार आणि बाजार समितीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. बाजार समितीला होणार्या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मत्स्य वाहतुकीवर कर आकारला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
मासेमारी कृषी क्षेत्रात मोडत असली तरी शेतकर्यांना कृषीचे जे लाभ मिळतात ते मच्छीमारांना मिळत नाहीत. त्यामुळे मत्स्य वाहतुकीवरील कर का सुरू केला जातोय? असा संतप्त सवाल मच्छीमारांकडून केला जात आहे. रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत या कर आकारणीबाबत चर्चा होणार आहे. कर आकारणी सुरू केल्यानंतर राजकीय वाद-विवाद निर्माण होऊ नयेत यासाठी समितीचे पदाधिकारी आणि सदस्य सर्व राजकीय नेत्यांशी संपर्क साधणार आहेत. परंतु, मासेमारी हा अनिश्चित उद्योग असून गेल्या वर्षांपासून तोट्यात चालला आहे. मासळी वाहतुकीवर कर लावणे अन्यायकारक असल्याचे मत मत्स्य व्यवसाय करणार्यांकडून व्यक्त होत आहे.