। खारेपाट । प्रतिनिधी ।
टाकादेवी स्पोर्ट क्लब व ग्रामस्थ मांडवा तालुका अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पौर्णिमानिमित्त सोमवारी (दि.19) राज्यस्तरीय भव्य कुस्ती जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी एक ते तीन क्रमाकांने विजयी होणार्या कुस्तीपटुंना आकर्षक चषक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच, आव्हानाच्या कुस्ती विजेत्या स्पर्धकाला मोठी गदा व भरीव रोख पारितोषिक देण्यात येणार असून प्रत्येक विजयी होणार्या स्पर्धकांना चषक व रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
मांडवा येथे दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या कुस्ती स्पर्धेला महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले खेळाडू उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता अलिबाग तालुकासह रायगड जिल्हा, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, सांगली सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई रेल्वे तसेच विविध आखाड्यातील नामांकित मल्ल यावेळी कुस्तीचे प्रदर्शन करणार आहेत.
या राज्यस्तरीय भव्य कुस्तीचा शुभारंभ उपवन संरक्षण विभाग अधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता होणार आहे. तसेच, या भव्य स्पर्धेला रायगड जिल्ह्यातील आजी-माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मंडळाच्या वतीने सर्व क्रीडा प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व राज्यस्तरीय कुस्त्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेकरिता पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, सदस्य, उद्योग व विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत.