| जम्मू काश्मीर | वृत्तसंस्था |
देशभरात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा उत्साह दिसत असून सर्वत्र तिरंग्यातील रोषणाई दिसून येत आहे. देशभक्तीची गाणी, तिरंग्यात सजलेली ऐतिहासिक ठिकाणं दिसून येत आहे. सोशल मीडियावरही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून येत असतानाच, जम्मू काश्मीरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैन्याच्या कॅप्टनला वीरमरण प्राप्त झाले आहे. सैन्य दलाच्या पथकाने या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचीही माहिती आहे. कॅप्टन दीपक हे आपल्या पथकाच्या नेतृत्वात या दहशतवाद्यांशी लढत असताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतमातेने आपला पुत्र गमावला आहे. दहशवाद्यांची गोळी लागल्यानंतरही कॅप्टन दीपक त्यांचा सामना करत होते.
भारतीय सैन्याचे जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पटनीटॉप जंगलातील अकर क्षेत्रातील एका नदीकिनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. बुधवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात येत असलेल्या जागेवर आपली शस्त्र टाकून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. घटनास्थळावरुन अमेरिका एम 4 रायफलही जप्त करण्यात आली असून तीन बॅगेतून स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली दहशवाद्यांच्या घटनांवरुन बैठका सुरू असून गुप्तचर यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गुप्तचर माहितीचा हवाला देऊन एका सूत्रानं सांगितलं की, “जम्मू आणि काश्मीरमधील कठुआच्या सीमेवर असलेल्या एका गावात अलीकडेच शस्त्रांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्या आहेत. ते जवळच्या पठाणकोट शहराकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.” सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “1 जून रोजी स्फोटकं/आयईडीची खेप जम्मू शहराच्या अंतरावर पोहोचली. या स्फोटकांचा वापर आगामी काळात सुरक्षा आस्थापना, कॅम्प, वाहनं किंवा महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो.”