महिला, तरुणी, विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी दुचाकीद्वारे गस्त
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
महिला, तरुणी व विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी अलिबागमध्ये दामिनी पथक सज्ज झाले आहेत. रोड रोमिओंवर या पथकाची दुचाकीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्याची सुरुवात रक्षाबंधनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे. त्यामुळे पिडीतांना दामिनी पथकाचा आधार मिळणार आहे.
अलिबाग हे पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाणही आहे. शहरात वेगवेगळे शासकिय कार्यालये असून खासगी कार्यालयेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातील महिला, तरुणी, विद्यार्थीनी अलिबागमध्ये नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी येत असतात. अलिबागला पर्यटनाच्या दृष्टीने महत्व वाढू लागल्याने पर्यटनासाठी येणार्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाच्या ताफ्यात दुचाकी देण्यात आल्या आहेत. यावेळी अलिबाग पोलीस ठाण्यात दोन दुचाकी दाखल झाल्या आहेत.
रक्षाबंधनाच्यानिमित्ताने या दुचाकींद्वारे रोड रोमिओंवर नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग व वरसोली समुद्रकिनार्यांसह येथील परिसरासह, शाळा, कॉलेज, एसटी बस स्थानक, शासकिय कार्यालय, जिल्हा रुग्णालय, तसेच निमशासकिय कार्यालयात ये-जा करणार्या महिला, तरुणी, विद्यार्थीनी, महिला पर्यटकांच्या मदतीला दामीनी पथक असणार आहे. प्रत्येक दुचाकीवर दोन महिला असणार आहेत. अशा एकूण चार महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत परिसरात दामिनी पथकाची दुचाकीद्वारे गस्त राहणार असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठ कार्यालयाकडून दामिनी पथकाला दोन दुचाकी देण्यात आल्या आहेत. महिला, तरुणी, विद्यार्थीनी, पर्यटक महिला यांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दामिनी पथक दुचाकीच्या मदतीने पेट्रोलिंग करणार आहेत. महिलांच्या सुरक्षेदृष्टीने हे पाऊल उचलले आहे. दुचाकीद्वारे गस्त घालण्याची सुरुवात रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने केली आहे. यासाठी चार महिला पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
– किशोर साळे, पोलीस निरीक्षक, अलिबाग पोलीस ठाणे