कारचालकाने 5 जणांना उडवले
। ठाणे । प्रतिनिधी ।
अंबरनाथमधील एका अपघाताचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील दोन कुटुंबीयातील वाद विकोपाला गेला असून एकाने दुसर्यावर कार घालत अपघात करून मारण्याचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
बदलापूरात उग्र आंदोलन सुरू असताना अंबरनाथमध्ये एस थ्री हॉटेल समोर मुंबईच्या दिशेने जाणार्या मार्गावर अपघाताची घटना घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास पांढर्या रंगाच्या गाडीतील चालक गाडीचा दरवाजा उघडून बाहेर थांबला होता. यावेळी त्याच्यासोबत आणखी दोन जण उभे होते. अशावेळी काळ्या रंगाच्या कारचा चालक मागून वेगाने येतो आणि सफेद कारला घासून निघून जातो. यावेळी काळ्या रंगाच्या बोनेटवर एक व्यक्ती अडकतो आणि त्याला चालक पुढे फरफटत घेऊन जातो.
काळ्या रंगाची कार थोडी पुढे जाऊन यूटर्न मारते आणि पुन्हा सफेद कारला समोरून जोरदार धडक देते. यावेळी सफेद कारमध्ये काही महिला व लहान मुले असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात सफेद कारमधील 4 ते 5 जण गंभीर जखमी झाली आहेत. यात लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व जखमींना उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फरफटत घेऊन गेल्याची व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावरून जाणार्या प्रवाशांनी संताप व्यक्त करत काळ्या रंगाच्या कारची तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी संपत्तीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, अंबरनाथ पोलीस ठाण्यात अद्याप या प्रकरणी तक्रार दाखल झालेली नाही.