| रसायनी | वार्ताहर |
कुंभिवली येथील विश्वनिकेतन संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, हे गेल्या दहा वर्षांपासून भारतातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये 45 दिवसांसाठी प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहे. मागील दहा वर्षांत या उपक्रमाद्वारे भारतातील 150 महाविद्यालयांतील 1550 विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. यावर्षी 100 हून जास्त महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांचे 3000 नोंदणीसाठी आवेदन प्राप्त झाले होते, त्यापैकी निकषानुसार 112 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
विश्वनिकेतन महाविद्यालयाचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. संदीप इनामदार, प्रिन्सिपॉल डॉ. बी. आर. पाटील, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग सेंटरचे संचालक प्रा. डॉ. विकास शिंदे, बिझनेस मॉडेलिंग सेंटर चे संचालक प्रो. डॉ. अंबुजकुमार ह्यांचे संकल्पना व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात सर्वाधिक उच्च दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. सदर नामांकित महाविद्यालयातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व आधिपत्याखाली महाविद्यालयाचे फॅकल्टी प्रा. पल्लवी डोंगरे आणि प्रा. डॉ. भावेशकुमार पासी यांच्या यशस्वी समन्वयाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडत आहे.
या वर्षी पात्र ठरलेल्या 112 विद्यार्थ्यांना निवड करून अमेरिका, इंग्लंड, इटली, फ्रान्स, बल्गेरिया, थायलंड येथील महाविद्यालयात प्रोजेक्ट बेस्ड लार्निंग प्रणालीच्या अंतर्गत प्रकल्प प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. यासाठी भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी विश्वनिकेतन संस्थेने युरोप, अमेरिका या परदेशातील नामांकित विद्यालयांसोबत गेले दहा वर्षांपासून करार केलेले आहेत. या उपक्रमामुळे भारतीय विद्यार्थ्यांना इतर देशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील काळानुरूप बदलाची अद्यावत गुणवत्ता संपादन करून उच्च व तांत्रिक शिक्षणातील चालू घडामोडी आत्मसात करण्याचा विश्वास प्राप्त होत आहे.
या वर्षी विद्यार्थ्यांसह प्रा. डॉ. भावेश पासी, प्रा. डॉ. अंकुश पवार, प्रा. आकाश बिडवाईक, प्रा. निकिता दाभोळकर आणि प्रा. पल्लवी डोंगरे या सहा प्राध्यापकांनीही आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मूल्यसंवर्धनाचा अनुभव व संधी मिळाली.