। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
प्रभाकर पाटील आणि नामदेवशेठ खैरे यांच्यातील संबंधांमुळेच आमचे कुटुंब एकत्र आले. दिलदार, शब्दाला पक्का असणारा नेता म्हणजे नामदेवशेठ खैरे. आयुष्यभर संघर्ष केलेला एक राजकारणी मी नामदेवशेठच्या रुपात पाहिला आहे. पाली सोडल्यावर नांदगावला येताना आम्हाला भीती वाटायची एवढा नामदेव शेठचा दरारा असायचा. नामदेव शेठच्या पाठिंबामुळेच जिल्हा बँकेचे चेअरमन झालो. हे त्यांचे उपकार माझ्यावर आहेत, असे सांगत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी स्व. नामदेव खैरे यांच्या आठवणंना उजाळा दिला.
भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. नामदेवशेठ येसू खैरे यांच्या पुतळ्याचे अनावरण व श्रीमती सुशीला ताई नामदेव खैरे रंगमंच उद्घाटन तसेच विद्यालयाचे प्रा.संभाजी ढोपे यांचा सेवापूर्ती सोहळा सोमवारी (दि.26) कै. नामदेवशेठ खैरे सभागृह नांदगाव येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, संस्थेचे खजिनदार आत्माराम बेलोसे, माजी उपसभापती सुशीला खैरे, जागृती शिक्षण संस्था संथापक जे. बी. गोळे, माजी सभापती भारती शेळके, पुरदावडे सरपंच देविदास ढोपे, सुएसो सचिव रविकांत घोसाळकर, प्रा.राजेंद्र पालवे, आरडीसीसीचे संचालक किसन उमटे, अतिष सागले, संदेश सोनकर, माजी प्राचार्य बळीराम निंबाळकर, प्राचार्य संभाजी ढोपे, मिनाक्षी ढोपे, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, तालुक्यातील शिक्षक वृंद, माजी विद्यार्थी, ढोपे कुटुंबियांचे निकटवर्तीय, नातेवाईक आदी मान्यवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अशोक शिंदे यांनी केले.
यापुढे मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, नामदेवशेठ खैरे लढवय्या, गोरगरिबांसाठी झटणारा नेता होता. सुशीलाताई उपस्थितीत स्व. नामदेवशेठ खैरे यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. तसेच सुशीलाताईंच्या नावाने आज रंगमचाचे उद्घाटन झाले. याचा खूप आनंद होत आहे. आज सुरेश खैरेंच्या माध्यमातून तालुक्यातील महिला संघटनदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. नांदगाव येथे फार्मसी कॉलेज काढून शैक्षणिक संकुल वाढवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
धैर्यशील पाटील यांची राज्यसभेची खासदारकी अवघ्या 17 महिन्यांची आहे. 17 महिन्यांतील सहा महिने आचारसंहितेत जाणार आहेत. उर्वरित महिने कामकाज शिकण्यामध्ये धैर्यशील पाटील यांचा वेळ जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पेण-सुधागड-रोहा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष उमेदवार देणार असून निवडणूक लढणार आहे. अनेक वर्षांपासून हा विधानसभा मतदारसंघ शेकापक्षाच्या ताब्यात आहे. त्यामुळे आम्ही जागा लढवणारच आहोत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला शेतकरी कामगार पक्षाने सुरुवात केली असून या मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी कार्यकर्तेदेखील पक्ष संघटना बळकटीसाठी कामाला लागले आहेत, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
विविध कार्यक्रम संपन्न
स्व.नामदेवशेठ खैरे यांच्या पुतळ्याचे अनावरण शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणिस जयंत पाटील व रंगमचाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या शुभहस्ते झाले. तसेच शेतकरी कामगार पक्ष सुधागड पाली येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन, प्राचार्य संभाजी ढोपे यांचा सेवापूर्ती आणि संस्थचे खजिनदार आत्माराम बेलोसे यांचा विशेष सत्कार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. संभाजी ढोपे यांच्या गौरव अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संघटन करा-जयंत पाटील
नामदेवशेठ खैरे यांचे सहकारी आत्माराम बेलोसे यांचा सन्मान करतानादेखील आनंद झाला. त्यांच्या शंभरीला आवर्जून येईन. या कार्यक्रमाचे केलेले नियोजन पाहून भारावून गेलो. शिवपूर्ती शिक्षक संभाजी ढोपे यांनी हवी तशी शाळा तयार केली हे पाहून समाधान मिळाले. आपल्या सेवानिवृत्तीनंतर पुरोगामी शिक्षक संघटनेमध्ये सामील व्हा, काम करा, संघटन करा, माझे पाठबळ आपणास नेहमी असेल. तुमचे पुढील आयुष्य सुखी, निरोगी जावो, यासाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.