आदित्य ठाकरेंनी बाळगला संयम; खासदारांच्या तोंडी घुसून मारण्याचीभाषा
। मालवण । प्रतिनिधी ।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी बुधवारी (दि.28) घटनास्थळी भेट देण्यासाठी राजकोट किल्ल्यावर गेली होती. मात्र, तत्पूर्वीच खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र किल्ल्यावर पोहोचले होते. त्याचवेळी, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर, काही वेळातच दोन्ही गटात हमरीतुमरी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर नारायण राणेंनी वापरलेली घुसून मारण्याची भाषा स्थानिकांच्याही पचनी पडली नाही. याचे पडसाद सोशल मिडियावरही पहायला मिळाले. अनेकांनी राणे पिता-पुत्रांच्या दबंगशाहीला लगाम लावण्याची मागणी त्या माध्यमातून केली.
विशेष म्हणजे यावेळी खुद्द नारायण राणे यांनी पोलिसांसमोर येऊन काही जणांना इशाराच दिला. आमच्या जिल्ह्यात येऊन दमदाटी खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यावेळी, थेट घरातून खेचून रात्रभर मारीन, असा इशाराही नारायण राणेंनी राड्यानंतर दिला. यावरुन सत्तेची अरेरावी दिसून आल्याचे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले.
राड्यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांशी संवाद साधताना नारायण राणेंचा पार चांगलाच चढला होता. पोलिसांसमोरच एकेकाला मारुन टाकेन, सोडणार नाही, अशी भाषा राणेंनी वापरल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शिवाय उघडपणे धमकी देणार्या नारायण राणे यांच्यावर पोलीस काय कारवाई करणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशू राणे म्हणाले, कोणीही मध्ये यायंच नाही. त्यानंतर, पोलसांना बोलताना, जेवढं सहकार्य करायचंय ते करा, तुम्ही त्यांना येऊ द्या, परवानगी द्या, आमच्या अंगावर घाला, घरात खेचून रात्रभर एकेकाला मारून टाकेन, सोडणार नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घटनास्थळी इशारा दिल्याचे पाहायला मिळाले. तसेच, आम्ही आमच्या भागात आहोत. बाहेरचे येऊन इथं दादागिरी करत असतील, पोलीस त्यांना प्रोटेक्शन देणार असतील तर आम्ही इथून अजिबात हलणार नाही, काय करायचे ते करा, गोळ्या घाला हलणार नाही, असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले, आम्ही इथून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा नारायण राणे यांनी घेतला होता.
दरम्यान, किल्ल्यावर पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाला शांत केलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही घटनास्थळी पोहोचले होते, त्यांनीही या राड्यावेळी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच ते तिथून निघून गेल्याचं पाहायला मिळालं.
माजी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात एकप्रकारची अस्वस्थता आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महायुतीला जेवढी इंजिन लावले, तेवढा भ्रष्टाचार वाढत आहे. आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन घेण्यात आले आहे. मात्र तिथे शिवद्रोही लोक आडवे आले. महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल. राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. 1 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष यात सहभागी असणार असून राज्यातील शिवप्रेमींनी यात सामील व्हावे.
छत्रपती संभाजीराजे
4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी मी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून हा पुतळा नियमानुसार उभारला नसल्याचे सांगितले होते. सात-आठ महिन्यांनी ही घटना घडली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. नियम धाब्यावर बसवून हा पुतळा का उभारण्यात आला, याचं उत्तर सरकारने द्यायला हवं. पुतळा कोसळण्याला हवेचा वेग जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. पण हवेच्या वेगाचा विचार सरकारने आधी करायला हवा होता. ही पूर्णत: सरकारची जबाबरदारी आहे. राज्यात अनेक असे पुतळे आहेत, जिथे हवेचा वेग मालवण पेक्षा जास्त आहे. मात्र, तेथील पुतळे आजही सुरक्षित आहेत. त्यामुळे हवेमुळे पुतळा पडला, हे सरकारचं उत्तर होऊ शकत नाही.
अजित पवारांनी मागितली माफी
शिवराय आपले दैवत आहेत. शिवरायांचा पुतळा पडणं हे आपल्या सर्वांना धक्का देणारं आह. कुणी केलं, काय केलं, त्याचा तपास लावला पाहिजे. त्या संदर्भात मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी याबद्दल महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो. युगपरुष छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे दैवत आहेत. त्या दैवतांचा पुतळा वर्षाच्या आत नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सर्वांना धक्का देणारं आहे. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील, मग ते कुणीही असूद्यात, वरिष्ठ अधिकारी असूद्या, खालचे अधिकारी असूद्या. कंत्राटदार असूद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.