दोन सुवर्ण, दोन रौप्य पदकं घातली खिशात
। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय पॅरा अॅथलीट सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहेत. 4 सप्टेंबर म्हणजेच सातव्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदके आणि 2 रौप्यपदक पटकावली आहेत.
भारताने पहिल्यांदाच पॅरा तिरंदाजी आणि क्लब थ्रोमध्ये सुवर्णकामगिरी केली. तर गोळाफेकमध्ये भारताने 40 वर्षांनंतर पदक पटकावले. मराठमोळ्या सचिन खिलारीने सातव्या दिवशी पदकांचा सिलसिला सुरू केला. भारताच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक 46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. यानंतर भारताच्या हरविंदर सिंहने पॅरा तिरंदाजी सिंगल्समध्ये सुवर्णपदक पटकावले. तर भारताच्या धर्मबीरने क्लब थ्रोच्या 51 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. याच स्पर्धेत प्रणव सुरमाने रौप्यपदक पटकावले आहे. सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. या रौप्य पदकासह, सचिन 40 वर्षांत पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये पहिले पदक जिंकले होते. आपल्या क्रीडा कौशल्यासोबतच मेकॅनिकल इंजिनीयर म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही यश संपादन केले आहे. तो वेगवेगळ्या संस्थांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करतो, विद्यार्थ्यांना त्यांच्या आणि परीक्षेच्या तयारीत मदत करतो. हरविंदर सिंहने तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले आहे. हरविंदरने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात पोलंडचा पॅरा अॅथलीट लुकास सिझेक याचा सलग तीन सेटमध्ये पराभव करून पदक जिंकण्यात यश मिळविले. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील तिरंदाजीमधील भारताचे हे पहिले पदक आहे.
हरविंदर सिंगची चमकदार कामगिरी सुवर्णपदकाच्या सामन्यात पाहायला मिळाली. ज्यात त्याने पहिला सेट 28-24 अशा गुणफरकाने जिंकला आणि 2 महत्त्वाचे गुण मिळवले. यानंतर दुसर्या सेटमध्ये हरविंदरने पुन्हा 28 गुण मिळवले आणि प्रतिस्पर्धी 27 गुण मिळवून पिछाडीवर राहिला, त्यामुळे हा सेटही हरविंदरच्या नावावर राहिला आणि त्याने 4-0 अशी आघाडी घेतली. तिसर्या सेटमध्ये हरविंदरने 29-25 अशा फरकाने विजय मिळवत 2 गुण जमा करत 6-0 ने पराभूत केले.