। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहरातील काही मार्गांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच शनिवारी (दि.7) अनेक भागात गणपती आगमनाच्या मिरवणुका निघाल्या होत्या. यावेळी मोकाट जनावरांनी मुख्य रस्त्यावर ठाण मांडल्याने काही भागात वाहतूक कोंडी झाली होती. याचा त्रास गणेशभक्तांना झाला. शहरातील साळवी स्टॉप, आरोग्य मंदिर, नाचणे, रेल्वे स्टेशन, आठवडा बाजार येथे मोकाट जनावरे रात्रीच्या वेळीही ठाण मांडून बसतात. यामुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. याची दखल घेऊन रस्त्यावर बसलेल्या मोकाट जनावरांचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.