ग्रामपंचायत प्रशासनाविरूद्ध संताप
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतिच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर एका खासगी कंपनीकडून केबल टाकली जात आहे. ही केबल नेरळ गावातील गटारे तसेच रस्त्यांच्या बाजूला खोदकाम करून टाकली जात असून त्याला नेरळ ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत केबल टाकू नये असा निर्णय झालेला असताना देखील संबंधित कंपनीकडून दिवसरात्र केबल टाकण्याची कामे सुरु आहेत.
यावर्षी पावसाळ्यात ग्रामपंचायत हद्दीत असलेली गटारे थोडासा पाऊस पडला तरी तुडुंब भरून वाहत असल्याचे दिसून आले होते. यानंतर काही जागरूक ग्रामस्थांनी गटारे तुडुंब भरून का वाहतात? याचा अभ्यास केला असता नेरळ गावातील गटारांमध्ये केबल टाकण्यात आल्याचे दिसून आले. यानंतर 3 सप्टेंबर रोजी नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांनी गटारांमध्ये कोणत्या कंपनीच्या केबल टाकण्यात आल्या आहेत, याची माहिती मागितली असताना एअरटेल कंपनीच्या केबल टाकण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून देण्यात आली. याबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांनी केव्बल टाकण्याची परवानगी ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे का, रस्ते खोदण्यासाठी किती लाखाचा निधी सुरक्षा अनामत म्हणून राखीव ठेवण्यात आला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले असता सरपंच उषा पारधी या निरुत्तर झाल्या. यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठराव घेण्यात आला आणि गटारांमध्ये तसेच रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असलेली केबल तात्काळ काढण्यात यावी, अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता.
मात्र, ग्रामसभा झाल्यानंतर 15 दिवसांचा कालावधी लोटला असून आजही नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या आजूबाजूला केबल टाकण्याचे काम वेगाने सुरु आहे. रस्ते खोदून केबल टाकल्या जात असून त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीकडून कोणत्याही स्वरूपातील परवानगी देण्यात आलेली नाही. दुसरीकडे नेरळ ग्रामीपंचायतीच्या कार्यालया बाहेर गेली आठ दिवस रस्त्याच्या आजूबाजूला खोदकाम केले जात असून ते काम बंद करण्याची हिम्मत प्रशासन करताना दिसत नाही. यामुळे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, गटारांमध्ये टाकण्यात आलेल्या केबल अजूनही काढण्यात आल्या नाहीत. शिवाय नव्याने रस्ते खोदून केबल टाकण्यात येत असल्याने या केबल कंपनी विरुद्ध संताप व्यक्त होत आहे.