चिंचोटी येथील शेकापच्या महिला मेळाव्याला अलोट गर्दी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांची तलवार तसेच ज्योत घेऊन आम्हा सावित्रीच्या लेकींना पुढे जायचे आहे. बचत गट हे माध्यम आहे. मेळावा हे जनजागरण आहे. या मेळाव्यातून संघटन करुन आम्हाला आमच्या पोटातलं ओठात आणायचे आहे. आणि ओठातलं बाहेर काढून आम्हाला समाजामध्ये परिवर्तन करायचे आहे. ते परिवर्तन जे गोरगरीब जनतेला तिच्या जमिनीवरचे हक्क, तिचा हक्क आधारित योजना आणि विश्वास देतील, ज्यांना पाण्यावर अधिकार देतील आणि असलेल्या अधिकारांवरचे जे कायदे आहेत, त्या कायद्याची स्त्रीवादी दृष्टीकोनातून त्याची अंमलबजावणी होईल तिथेच खऱ्या अर्थाने आमच्या या बचत गटांच्या मेळाव्याचा उद्देश साध्य होईल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शुक्रवारी (दि. 20) महिलांसाठी रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत ‘लेक शिवबाची’ भव्य संवाद मेळावा रामराज विभागातील चिंचोटी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, ही भूमी नारायण नागू पाटलांची आहे. ही भूमी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची, ही भूमी जिजाऊंची आहे. हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले तसेच राजा छत्रपती शाहू महाराजांचा आहे. आपणा सर्व रणरागिणींना स्व. मीनाक्षी पाटील यांचा वारसा आहे. त्यामुळे आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेली असून, पोटातील ओठावर आणण्याची वेळ आली आहे. आणि जे ओठात आहे ते सार्वजनिकरित्या बोलण्याची वेळ आलेली आहे. ती ताकद माझ्या रणरागिणींमध्ये आहे. यावेळी सरकारने मतांवर डोळा ठेवून विविध योजना सुरू केल्याचे सांगितले. परंतु, आमच्या या कष्टकारी माताभगिणी खऱ्या अर्थाने शिकलेल्या असून, सुजाण व हुशार आहेत. त्या आमच्यासरख्या शिकलेल्या बायकांपेक्षा दहा पावले पुढे असल्याने सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचा विश्वासही वैशाली पाटील यांनी व्यक्त केला आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले तरीदेखील चित्र काही फारसे बदलले नाही. हे चित्र बदलण्याची क्षमता फक्त पुरोगामी विचाराच्या शेतकरी कामगार पक्षात आहे. आता अन्यायाविरोधात बोलण्याची, लढा देण्याची वेळ आली आहे.
यावेळी डॉ. वैशाली पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील (चिऊताई), शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेवक वृषाली ठोसर, देवायनी पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विद्या म्हात्रे, प्रिया पेढवी, अश्लेषा नाईक, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, नीरजा नाईक, रश्मी वाळंज, ॲड. निहा राऊत, विक्रांत वार्डे आदी मान्यवर, तसेच ग्रामपंचायत बोरघर, रामराज, चिंचोटी, सुडकोली, बेलोशी येथील आजी-माजी सरपंच व शेकाप कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शेकाप तुमच्या सदैव पाठीशीः चित्रलेखा पाटील
महागाईच्या झळा महिलांना पोहोचत आहेत. सिलिंडरचे दर वाढले आहेत. महिन्याचा आर्थिक ताळमेळ जुळवताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सरकारने निवडणुका समोर ठेवून योजना सुरु केल्या आहेत. याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. सध्या देशाची, राज्याची परिस्थिती भयावह आहे. सर्वसामान्यांना वेटीस धरण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकजुटीने संघर्ष व लढा देण्याची गरज आहे. शेकाप तुमच्या सर्वांच्या पाठीशी कायम राहील, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.
यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, सर्व महिला मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचा आनंद आहे. महिला स्वाभिमानाने जगल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे. महिलांनी ठरवले तर काहीही करू शकतात. महिलांचे कोणतेही प्रश्न असोत, ते सोडवण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहीन. खासदारकीच्या निवडणुकीत विरोधकांनी जिंकण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला. पण, या भागातील महिला कार्यकर्त्या पैशासमोर झुकल्या नाहीत. त्या आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्या. या निवडणुकीत रामराज विभागातील मतदार, कार्यकर्ते व महिलांनी गीते यांना बहुमत दिले. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीसमोर कधीच झुकले नाहीत. पण, सत्तेसाठी आजचे राज्यकर्ते मोदी, शाहांसमोर झुकले, ही मोठी शोकांतिका आहे. शेतकरी कामगार पक्ष हा शेवटच्या घटकांपर्यंत काम करणारा पक्ष आहे. तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच शेकाप कटिबद्ध आहे. या विभागाने शेकापसह आपले नेते जयंत पाटील यांच्यावर अमाप प्रेम केले. हे प्रेम असेच कायम राहू द्या. आपल्याकडील पाण्याचा व रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन. शेतकरी कामगार पक्षच रोजगार देणारा पक्ष आहे. प्रत्येक गावातील अनेकांना नोकऱ्या देण्याचे काम शेकापने केले आहे. ज्याप्रमाणे उमटे धरणातील गाळ काढून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याप्रमाणे या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार, असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महिला सुरक्षिततेसाठी एकजूट महत्त्वाचीः ॲड. मानसी म्हात्रे
आज निसर्गरम्य परिसरात पाच ग्रामपंचापतींच्या पंचक्रोशीत तुम्हा सर्वांच्या साक्षीने हा महिलांसाठी बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 30 वर्षांपासून गोरगरीब, मागास महिलांसाठी वैशाली पाटील काम करत आहेत. त्यांचा प्रवास आपल्या पक्षाचे दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांच्या कालखंडात झाला आहे. सरकारने अनेक योजना आणल्या. परंतु, जोपर्यंत आपण महिला सक्षम होण्यासाठी ठरवत नाही.
मला कोणावर अवलंबून राहायचं नाही. ही भूमिका आपण घेतली पाहिजे. तू सुरक्षित नाही, हे काही मालिकांच्या माध्यमातून दाखवले जाते. असुरक्षिततेची भीती निर्माण केली जाते. महिला अत्याचारांच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. समाजाचा विकास होत असताना महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. शासन सक्षम का नाही, जर सक्षम नसेल तर सुरक्षिततेसाठी एकजूट होण्याचा निर्धार करुया. आजच्या मेळाव्याची टॅगलाईन ‘लेक शिवबाची’ ही आहे. मरावे ते शिवबासारखे आणि जगावे ते जिजाऊसारखे या भूमिकेतून महिलांनी सक्षम होणे आवश्यक आहे.