| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील गोमाशी येथील पशुपालक हरिदास गायकवाड यांच्या जर्सी गायीची दोन दिवसांपासून प्रसूती होत नसल्यामुळे पशुसंवर्धन विभाग सुधागड अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना नांदगाव यांच्याशी संपर्क साधला असता पशुसंवर्धन विभागाचे युवराज सुरकुले, सचिन ओहोळ, चंद्रकांत बर्गे, वारगुडे हे ताबडतोब पशुपालक गायकवाड यांच्या वाड्यावर उपस्थित झाले.
गायीच्या प्रसूतीदरम्यान वासरू गायीच्या पोटात दगावल्यामुळे ते फुगले. मृत वासराला बाहेर काढून गायीचे प्राण वाचविणे हे या सर्व पशुसंवर्धकांपुढे आव्हान होते. सलग तीन तासांच्या अथक प्रयत्नाने गायीच्या पोटातील वासरू बाहेर काढले व गायीला जीवनदान दिले. ही गायीची अवस्था बघून पशुपालक गायकवाडच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. त्यांचे खूप मोठे नुकसान होण्यापासून टळले. पशुपालक हरिदास गायकवाड यांनी पशुसंवर्धन विभागाचे आभार मानले. गायीची व्यवस्थित प्रसूती होण्याकरिता गाभण काळात, विताना व विल्यानंतर चांगली काळजी घेतली पाहिजे, तिला पोषक चारा-खाद्य द्यावे व गायीला विताना अडचण आली किंवा काहीही प्रसूती संबंधित अडचण असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा, असे डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी सुधागड पाली यांनी पशुपालकांना सांगितले.