नाचणी पिकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी महिलांचा पुढाकार
| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील रोवळा या गावात कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत नाचणी पिकाची प्रात्यक्षिके सुधारित पद्धतीने राबवण्यात येत आहेत. नाचणी पिकाची प्रात्यक्षिके राबवण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला असून, रोवळा येथील संतोषी माता महिला शेतकरी गट या गटातील महिलांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर सुधारित जातीच्या नाचणीची लागवड केली आहे.
नाचणी सुधारित जातीचे उत्पादन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून घेण्यात येत आहे. यासाठी रोवळा गावातील कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे व आत्मा बीटीएम सचिन लोखंडे यांच्याकडून वेळोवेळी महिलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच या महिला बचत गटांकडून नाचणीपासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात येणार आहेत यासाठी कृषी विभागाकडून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. रोवळा गावास भविष्यात ‘नाचणीचे गाव’ म्हणून ओळख निर्माण करण्याचा या महिला बचत गटाचा मानस आहे. नुकतेच शासनाकडून आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले. या अंतर्गत नाचणी पिकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमातूनच प्रेरणा घेऊन या महिला संघटित होऊन नाचणीचे पीक घेत आहेत.
रोवळा गावातील लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. गावामध्ये शेती सोडून इतर कोणतेही साधन नसल्यामुळे शेतकर्यांचे गावामधून शहराकडे स्थलांतर होत आहे. हे स्थलांतर थांबवण्यासाठी महिलांचा प्रयत्न सुरू आहेत. नाचणीपासून बनवलेल्या उपपदार्थांची विक्री करून गावातील गरजू, बेरोजगार मुला-मुलींना रोजगार मिळणार आहे. यामुळे रोवळा गावची ओळख नाचणीचे गाव म्हणून तयार होण्यास मदत होणार आहे. सध्या पाच हेक्टर वर नाचणीचे पीक घेतले जाणार आहे. यासाठी रब्बीमध्ये कडधान्ये कृषी विभागाकडून पुरविण्यात येणार आहे. रोवला येथील बचत गटातील जवळपास 21 महिला नाचणी पिकाची लागवड करणार आहेत.
कृषी विभाग नाचणी पिकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून, त्याला रोवळा व परिसरातील गावातून चांगले यश येताना दिसून येत आहे.
गोविंद पाशीमे,
कृषी सहाय्यक







