| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावपासून 12 कि.मी. अंतरावर असणार्या पोटणेर गावच्या हद्दीत कार आणि मोटारसायलकचा भीषण अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणार्या इंडीव्हर कारने पाठीमागून मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.3) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद उमेश शंकर खैरे (40) रा. धाटाव, ता. रोहा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत माणगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत भागोजी मालू खैरे (67) रा. धाटाव, ता. रोहा हे त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल (एमएच 06 बीसी 1405) स्वतः मुंबई-गोवा महामार्गाने चालवीत घेऊन जात होते. दरम्यान, पोटणेर गावच्या थांब्याजवळ आले असता उजव्या बाजूकडील इंडिकेटर देऊन रस्त्याची खात्री करून पोटणेर गावाकडे वळत असताना पाठीमागून येणार्या इंडीव्हर कार (क्र.एमएच 02 ईई 7520) चालकाने पाठीमागून अतिवेगात येऊन मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात भागोजी मालू खैरे यांना गंभीर दुखापती होऊन त्यात त्यांचा मृत्यू होऊन मोटारसायकलचे नुकसान झाले. अपघातानंतर कारचालक पळून गेला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दोडकुलकर करीत आहेत.







