बारावीमधील दोन विद्यार्थ्यांविरुध्द गुन्हा दाखल
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल भागात राहणार्या आणि इयत्ता 12 वीत शिक्षण घेत असलेल्या 2 विद्यार्थ्यांनी एका 15 वर्षीय शाळकरी मुलीचे मॉर्फिंग करुन तयार केलेले अश्लील फोटो शाळेच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणी 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात आयटी अॅक्टसह पोक्सो तसेच बदनामीकारक माहिती प्रसिध्द केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील 15 वर्षीय शाळकरी पीडित मुलगी पनवेल भागात राहण्यास असून सध्या ती शिक्षण घेत आहे. पीडित मुलीने काही महिन्यापूर्वी आपल्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरु केले होते. याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरील या मुलीचे फोटो पनवेलच्या नेरे गावात राहणार्या आणि इयत्ता 12 वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने चोरले. त्यांनतर त्याने मॉर्फिंग करुन पीडित मुलीचे अश्लील फोटो तयार करुन ते शाळेच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर व्हायरल केले. त्यानंतर पनवेलच्या करंजाडे भागात राहणार्या दुसर्या विद्यार्थ्यानेदेखील त्या मुलीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल केले. दरम्यान, पीडित मुलीचे व्हायरल झालेले अश्लील फोटो तिच्या मैत्रिणीच्या निदर्शनास आल्यानंतर तिने सदर मुलीला त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीने व्हायरल झालेल्या फोटोचा शोध घेतला असता, नेरे गावातील तरुणाने तिचे फोटो चोरुन मॉर्फिंग करुन ते फोटो शाळेच्या इन्स्टाग्राम ग्रुपवर व्हायरल केल्याचे आढळून आले. तसेच करंजाडे भागात राहणार्या दुसर्या विद्यार्थ्यानेदेखील तीचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर सदर मुलीने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.