| रसायनी | वार्ताहर |
रसायनीतील पिल्लई शाळा आणि कॉलेज बांधत असताना आंबिवली तर्फे तुंगारतन (खाने आंबिवली) गावकर्यांना गावातील सर्व मुलांना प्रकल्पग्रस्त या नात्याने मोफत शिक्षण देऊ, असे शाळा प्रशासनाने सांगितले होते. त्या वचनपूर्तीसाठी मनसे मैदानात असून, त्यास ग्रामस्थांचा मोठा सहभाग व पाठिंबा मिळत आहे.
त्याअनुषंगाने मनसेचे वासांबे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांनी दोन टप्प्यात ठिय्या आंदोलन करुन न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न केला; परंतु पिल्लई प्रशासनाकडून मागण्या मान्य न झाल्याने तिसर्या टप्यात बेमुदत धरणे आंदोलन मंगळवार, दि. 2 ऑक्टोबरपासून बसले असून, रसायनी परिसरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते धरणे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून विनोद शिंदे यांना पाठिंबा देत आहेत. स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी रसायनी पाताळगंगा परिसरातील सर्व राजकीय पदाधिकारी एकवटले असून, पाठिंबा देत आहेत.