26 जानेवारीची ग्रामसभा न घेतल्याने निर्णय; जिल्हाधिकार्यांचे आदेश
| पेण | वार्ताहर |
तालुक्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा सचिन पाटील यांनी 26 जानेवारी 2024 ची ग्रामसभा न घेतल्याचा फटका बसला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत वरसई येथील ग्रामसेवक यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे. त्यानुसार ग्रामसेवक यांच्यावरसुद्धा निलंबनाची टांगती तलवार कायम आहे.
ग्रामस्थ किरण शिगवण यांनी याबाबत रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागितला होता. याबाबतचा महत्त्वपूर्ण निकाल मंगळवारी (दि. 8) रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 36 नुसार सरपंच किंवा त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच यांनी पुरेशा कारणांशिवाय त्याबाबत विहित केलेल्या नियमांनुसार कोणत्याही वित्तीय वर्षात पंचायतीच्या सभा बोलावण्यात कसूर केल्यास तो यथास्थिती सरपंच किंवा उपसरपंच म्हणून राहण्यास अपात्र असेल. यासंदर्भात पुरेसे कारण होते की नाही, याबाबत जिल्हाधिकारी यांचा निर्णय अंतिम असेल, अशी तरतूद आहे.
26 जानेवारी 2024 रोजी वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंच रेखा सचिन पाटील यांनी ग्रामसभा घेतली नाही. याबाबतीत हिंदू स्वराज्य सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किरण शिगवण यांनी या संदर्भात जिल्हाधिकार्यांकड 29 मार्च 2024 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होती. या संदर्भात विस्तार अधिकारी, पेण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी यथायोग्य चौकशी करून आपला अहवाल जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिगवण यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी यांनी रेखा पाटील यांना अपात्र ठरवून त्यांना सरपंचपदावरून पदच्युत केले आहे.






