। मुंबई । प्रतिनिधी ।
बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेनंतर विद्यार्थी सुरक्षेबाबत अधिक सतर्क झालेल्या शालेय शिक्षण विभागाने आता नव्या शाळांना मान्यता देणे, मान्यताप्राप्त शाळांचा दर्जा बदलणे, आदींसाठी नवे निकष जाहीर केले आहेत. या निकषांमध्ये विद्यार्थी सुरक्षेसाठी आवश्यक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. मान्यता किंवा दर्जा वाढ देताना या निकषांची पूर्तता शाळेने केली आहे किंवा नाही, याची सखोल तपासणी करण्यात आल्यानंतरच शाळेला मान्यता मिळणार आहे. या पूर्वीच्या निकषांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी, विद्यार्थ्यांची वाहतूक आदी बाबींची दखल घेतली गेली नव्हती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये स्कुल बसमध्ये, शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर होणार्या अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली आहे. बदलापूर येथील घटनेत शाळेतील सीसीटीव्ही चालू-बंद असल्याचे समोर आले होते. त्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याने शाळा मान्यतेसाठी सुरक्षेच्या विषयाचा समावेश करण्यात आला आहे.