पहिल्या टप्प्यात 1400 कोटींच्या तरतूद
। नेरळ । संतोष पेरणे |
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर बांधण्यात येणार्या कोंढाणे धरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोंढाणे धरण सिडको महामंडळ बांधणार असून हे धरण बांधण्यासाठी 2500 कोटी खर्च येणार आहे. कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथून पाणी उचलून नवी मुंबईत नेले जाणार आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून प्रकल्पामुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर कोंढाणे येथे मध्यम धरण प्रकल्प महाराष्ट्र शासनाने 2011 मध्ये मंजूर केला होता. मात्र झपाट्याने विकसित होणार्या सिडकोच्या नैना क्षेत्रातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी नवी मुंबईपासून 35 किलोमीटर लांब असलेल्या कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण आपल्याला मिळावे, यासाठी 2017 मध्ये प्रयत्न सुरु झाले. त्याआधी 2012 पासून कोंढाणे धरणाचे काम कथित सिंचन घोटाळ्यामुळे बंद ठेवण्यात आले होते. नवी मुंबईमधील नैना प्रकल्पासाठी पाणी आरक्षित करण्यासाठी कोंढाणे धरण प्रकल्प सिडको महामंडळाच्या मागणीनुसार राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी मान्य केले आणि हे धरण बांधण्यास सिडको महामंडळास परवानगी दिली. सिडको नैना क्षेत्रासाठी लागणार्या संभाव्य पाण्यावर हक्क कायम ठेवणार आहे. हे धरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी सिडको महामंडळाकडून धरणासाठी 291 हेक्टर वन जमीन आणि 97 हेक्टर खासगी जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणार्या मुंडेवाडी गावातील 118 कुटुंबांच्या पुनर्वसन केले जाणार आहे.
17 वर्षांपूर्वी या धरणाचा प्रस्ताव तयार केला होता. वन विभागाची 291 हेक्टर जमिन यापूर्वी हस्तांतरित झाली आहे. तर स्थानिक शेतकर्यांच्या 97 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण काम सुरू आहे. धरणाच्या कालव्यांमधून आजूबाजूच्या गावांमधील 250 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून तो परिसर हिरवागार होणार आहे. या धरणाच्या पहिल्या टप्प्यातील 1400 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली असून त्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा, म्हणून शासनाने 270 गावांलगतचे 474 किलोमीटर क्षेत्र हे नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रात विमानतळ, एसईझेड, कॉर्पोरेट आणि मनोरंजन या व्यावसायिक उपक्रमांबरोबर सिडको नैना नागरी क्षेत्र विकसित करीत आहे. या सर्व क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असल्याने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नैना क्षेत्रापासून 30 ते 35 किलोमीटर लांब आणि कर्जत शहरापासून 13 किलोमीटर दूर असलेल्या कोंढाणे धरणाचा पर्याय निवडण्यात आला आहे. या धरणाच्या पाण्यावर स्थानिक परिसरातील 250 हेक्टर जमिनीवर उन्हाळ्यात शेती देखील फुलणार आहे. तर धरणाच्या पाण्यामुळे उन्हळात कोरडी असलेली उल्हास नदी बारमाही वाहणार आहे.