। चिपळूण । वार्ताहर ।
लोटे येथील सुप्रिया केमिकल कंपनीचे मालक तथा राज्यातील प्रसिद्ध उद्योजक सतीश वाघ यांचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांच्याकडून उद्योजक म्हणून कौतुक करण्यात आले आहे. सतीश वाघ यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्ताने सदर कौतुक प्रमाणपत्राचे वितरण वाढदिवसाच्या शुभेच्छांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले आहे.
या प्रमाणपत्रात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुडो यांनी, उद्योजक सतीश वाघ, आपले काम कौतुकास्पद आहे. आपण उत्तरोत्तर अशीच प्रगती साधून देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे नमुद केले आहे. प्रसिद्ध लेखक डॉ. ढवळे यांच्याद्वारे हे प्रमाणपत्र भारतात पाठविण्यात आले आहे.
उद्योजक सतीश वाघ यांच्या सुप्रिया केमिकल कंपनीचे काम सातासमुद्रापार पोहचले आहे. कंपनीच्या हिताच्या दृष्टीने तेही अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यासाठी जगभर भ्रमंती करीत आहे. त्यांच्या कंपनीवर अनेक कामगारांचे कुटुंब उदरनिर्वाह करीत असून कामगारावर नितांत प्रेम करणारा अवलिया म्हणून सतीश वाघ यांची विशेष ओळख आहे.