पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवर टीका
। पनवेल । वार्ताहर ।
राज्यात महायुती सरकारने उद्योजकांसाठी रेड कार्पेट अंथरले असून मोठी गुंतवणूक होत असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.16) महायुतीच्या पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, हा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडून काढला असून, मी आताच पनवेलच्या सहकारी औद्योगिक वसाहतीत रेड कार्पेटवरून आलो, असा खोचक टोला लगावला आहे. महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग आतापर्यंत आलेला नाही. यामुळे सरकारने उद्योजकांच्या जखमेवर मीठ चोळू नये. आणि उद्योजकांना रेड कार्पेट नाही तर साधे कार्पेट तरी अंथरा, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्वनियोजित दौर्यादरम्यान पनवेलमधील सहकारी औद्योगिक वसाहतीत उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. याठिकाणी सन 1960 सालापासून 92 कंपन्या खडतर परिस्थितीवर मात करून काम करत असूनही पायाभूत सुविधांची वानवा आहे. येथे कर्मचार्यांना राहायला घरे नाहीत, ड्रेनेजची सुविधा नाही, रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे दिसून येते. यामुळे एमआयडीसी, महापालिका व विद्यमान सरकारचे उद्योग खातेदेखील अशा सहकारी औद्योगिक वसाहतींना सापतन्य वागणूक देत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, आजच्या घडीला राज्यात सुमारे 200 सहकारी व खाजगी औद्योगिक वसाहती आहेत. यामुळे येथील पायाभूत सुविधांच्या विकासाची जबाबदारी एमआयडीसीने घेतली पाहिजे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रात प्रथम क्रमांकावर होते. मात्र, आज दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीत अकराव्या क्रमांकावर आहे याचे उत्तर मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी द्यावे. गुजरात, हरियाणा आणि दक्षिणेकडील राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेले आहेत. यामुळे हा विद्यमान सरकारचा नाकर्तेपणा असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नागराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे, संचालक अरुण पटेल, दीप लोखंडे, प्रशांत पोतदार, गौरव जोशी, सुनील जेठीया, सुजय सुरतकल, उद्योजक स्वरणपालसिंग कोहली, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, अमित लोखंडे, राकेश जाधव यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
भाजपाच्या विरोधातील लढाई सुरूच
आम्हाला 400 पार जागा द्या, ही घोषणा संसदेत नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींच्या खासदाराने आम्हाला दोन तृतीयांश बहुमत द्या, कारण आम्हाला संविधान बदलायचे आहे. मग फेक नरेटिव्ह कोणी पसरवले? संविधान बदलण्याच्या पाच घोषणा भाजपने केल्या. यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली म्हणूनच लोकसभेला जनतेने भाजपला धडा शिकवला. आता भाजपचे हात दगडाखाली आहेत. यामुळे या विरोधातील आमची ही लढाई सुरूच राहणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.